नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नामांकन प्रक्रियेचे वेळापत्रक (सोमवार, १९ जानेवारी)
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केल्यानुसार आजची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
दुपारी २ ते ४: नामांकन अर्ज दाखल करणे.
संध्याकाळी ४ ते ५: अर्जांची छाननी.
संध्याकाळी ५ ते ६: अर्ज मागे घेण्याची मुदत.
जर केवळ एकच अर्ज आला, तर नितीन नबीन यांची बिनविरोध निवड निश्चित होईल. निवडणुकीची गरज भासल्यास २० जानेवारी रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी नवीन अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
नितीन नबीन: ५ वेळा आमदार ते राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रवास
४६ वर्षीय नितीन नबीन हे बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १५ डिसेंबर रोजी त्यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नबीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे. पक्षातील एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, त्यांची नियुक्ती हा तरुण पिढीला संधी देण्याच्या भाजपच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.
५,७०८ मतदार करणार फैसला
भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी ३० राज्यांमधून एक ‘इलेक्टोरल रोल’ (मतदार यादी) तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ५,७०८ मतदार आहेत.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय परिषद आणि राज्यांच्या परिषद सदस्यांमधून हे निर्वाचक मंडळ तयार झाले आहे.
बिनविरोध निवडीचे संकेत
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव किमान पाच राज्यांतून प्रस्तावित होणे आवश्यक असते. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा नितीन नबीन यांना आहे. त्यामुळे आज दुपारी भाजप मुख्यालयात सर्व मोठे नेते उपस्थित राहून नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील.