Sunday, November 24, 2024

नृत्य ही सर्वसमावेशक कला

Share

आपल्या मनातील भावना शारीरिक हालचालींतून प्रदर्शित करणं, नृत्य करणं हा प्रत्येक प्राण्याचा स्वभावधर्मच आहे. ‘प्राणयेन सर्व लोकश्च्य नृत्यमिष्ट स्वभावतः’ असं नाट्यशास्त्रकार भरतमुनी म्हणतात. तो स्वभावधर्मच आहे. त्यानुसार समाजामध्ये नृत्याचे खूप वेगवेगळे प्रकार दिसतात. आदिवासींचं नृत्य, जानपद नृत्य, लोकनृत्य आणि ज्याला आपण शास्त्रीय नृत्य किंवा ज्याला मी अभिजात नृत्य म्हणते, तोही एक कलाविष्कार होतो. ज्या क्षेत्रात मी प्रथमपासून राहिले, काही काम करू शकले त्याबद्दल कृतज्ञ वाटते.

मला मुळातून असं वाटतं, की अन्न, वस्त्र, निवारा या ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत, त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट कला आहे. कारण कला हीच इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं करते. प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य कळतं. ते नुसतं भावणं नाही, तर ते भावनेला उद्दिपितही करतं आणि त्याबरोबरच बुद्धीलाही चालना देतं. तेव्हा ते अभिजात होतं. त्यातून काही मुळातील तत्त्वं आपल्याला कळतात, आयुष्याविषयीचा खरा आनंद कळतो, असं हे अभिजात नृत्य आहे. त्याची आजच्या काळात खूपच आवश्यकता आहे, असं मला वाटतं.

दहा वर्षांपूर्वी मला असं आठवत नाही की आम्ही असा नृत्यदिन वगैरे साजरा करत असू. पण आता प्रत्येकच गोष्टीचा दिवस असतो, जसे मदर्स डे, फादर्स डे – तसा हा नृत्यदिनही साजरा केला जातो ही चांगली गोष्ट आहे. त्याची आठवण त्या निमित्ताने सर्व समाजाला होते.

तसं पाहिलं तर नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे आणि आमचं शास्त्रीय नृत्य – अभिजात नृत्य तर निश्चितपणेच आहे. म्हणजे अवकाशाच्या कॅनव्हासवर काढलेल्या रेषा, शरीराच्या हालचालींमुळे सुरेख रेखाचित्र तयार होतं. भावभावनांचे रंग त्यात भरलेले असतात. शिल्प म्हणजेच स्थिर नृत्याकृती आणि नृत्य म्हणजेच चलशिल्पाकृती आहे. नृत्य हे संगीत तर आहेच. गायन वादन नर्तन या तिन्हीला मिळून संगीत ही संज्ञा वापरलेली आहे. तेव्हा ते जणू संगीताचंच दृश्य रूप आहे. ते नाट्यही आहे. त्यात काव्यरुपाने साहित्य येतं आणि काव्य हे थोडक्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी कमीत कमी शब्दांमध्ये सांगणारं असतं. ते कमी शब्द नृत्याच्या माध्यमातून, नृत्याच्या भाषेतून फुलवण्याचं काम अभिजात नृत्य करतं. त्यामुळं त्याचा आस्वाद घेण्यासाठी काही प्रयत्न रसिकांकडून होणं आवश्यक असतं. आज ते पुष्कळशा प्रमाणात होऊ लागलं आहे, असं दिसतं.

पूर्वी अभिजात नृत्याचा संबंध हा देवालयांशी होता. त्यामुळं देवादिकांच्या पुराणकथा, देवादिकांचे वर्णन, हे पारंपरिक अभिजात नृत्यशैलीतूंन अधिक दिसतं. याबाबत मला एक सांगावसं वाटतं, की पारंपरिक नृत्य, संगीत, कला म्हटलं, तर भारत हा विश्वातला सर्वाधिक श्रीमंत देश आहे असं मी म्हणेन. इतक्या सात – आठ प्रगत शैली, ज्या नुसत्या होत्या असं नाही. ज्या परंपरेने आजही टिकून आहेत, हे फक्त भारतातच आहे आणि दोन अतिशय प्रगत अशा अभिजात संगीत शास्त्रोक्त संगीत पद्धती कर्नाटक आणि हिंदुस्तानी त्याही आमच्याकडेच आहेत. हे जगात कुठंही नाही. त्यामुळं हे टिकवणं, हे वाढवणं ही आजची मोठी गरज आहे. मला आनंद वाटतो, की नव्या पिढीसाठी आज आता सगळं जग समोर आलेलं आहे. माध्यमं इतकी वाढलेली आहेत की कुठलीही गोष्ट गूगलच्या माध्यमातून तरुण पिढी पाहू शकते. पण तरीही प्रत्यक्ष त्याचं शिक्षण घेण्याचं जे महत्त्व आहे ते संस्कार आहेत. ही माध्यमं ते संस्कार करू शकत नाहीत. ते फक्त माहिती देतात. पण त्या माहितीचे संस्कार करून घेण्यासाठी, ती अंगीभूत बुद्धिजन्य करून घेण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. त्यामुळे आजच्या जगात कुठल्याही विषयात हे गुरू-शिष्याचं महत्त्वही समाजात समजलं जात आहे. आपल्याकडं ते मानलं जातंय ही मला चांगली गोष्ट वाटते.

नव्या पिढीकडं खूप चैतन्य आहे. त्याचा वापर करून घेण्याची जरूर आहे. आपल्याकडे लोकनृत्य आहेत. पूर्वीच्या काळी त्या त्या समाजाकडून, त्यांचा जो उद्योगधंदा असेल तशी येत. उदा. शेतकरीनृत्य किंवा भिलांचं नृत्य.. अशा तऱ्हेनं नृत्य वाढली. मी माझ्या अभिजात नृत्यामध्ये एम. ए. पीएच. डी. करणाऱ्यांना सांगते, की हा विषय अभ्यासाला जरूर घेण्यासारखा आहे. हे आपल्या संस्कृतीत आहे. आपले देवत्व एकच आहे. पण त्याची विविध रुपं आपण बघतो, म्हणजे एखाद्याला फक्त शरीर कमवायचे आहे, त्याच्यासाठी हनुमान आहे. नृत्यासाठी नटराज आहे. संगीतासाठी शारदा आहे. जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचे आहे, त्याचं एक उत्तम प्रतीक म्हणून ही सगळी दैवतं आहेत. त्याचा विचार अभिजात नृत्यातून केला जातो. मांडला जातो. ते नुसतं शब्दांना प्रत्यक्ष रूप देणं असता कामा नये. त्याच्या मागचा जो विचार आहे. तोही आमच्या नृत्याच्या भाषेतून सांगता आला पाहिजे. यासाठी त्याचं शिक्षण आवश्यक आहे.

मला आनंद वाटतो, की आता बऱ्याचशा शाळांमधून नृत्यशिक्षणाचा, अभिजात नृत्याचा एक भाग सुरू झालेला आहे. जो आणखी थोड्या वेगळ्या प्रकाराने आस्वादनात्मक स्तरावर झाला पाहिजे. तिथे त्यांना कळलं पाहिजे, की आमची ही शास्त्रीय अभिजात नृत्यशैली कशी वेगळी आहे. बॉलिवूड नृत्यापेक्षा कशी वेगळी आहे किंवा लोकनृत्यापेक्षा कशी वेगळी आहे. ती काय सांगते. या शैलीला कुठल्याही विषयाचे वावडे नाही. पारंपरिक अभिजात नृत्यात फक्त देवादिकांचे विषय नसतात. आपल्या सर्व पुराणकथा एक तत्त्व सांगत असतात. मॉरल सांगत असतात. ते लक्षात घेऊन जर त्याचं सादरीकरण झालं तर मग त्या नुसत्या देवांची गोष्ट न राहता त्यातलं तत्त्व लोकांपर्यंत पोचेल. मला वाटतं आज अभिजात नृत्य शिकवणाऱ्यांची ही जबाबदारी वाढली आहे. कारण तरुण पिढी अशी आहे, की एकदा तुम्ही त्याचं महत्त्व समजावून सांगितलंत आणि त्याची गोडी लावलीत की ते शिकतात. पण फक्त शारीरिक हालचाल शिकवणं नाही. त्याच्याबरोबर अनेक गोष्टी येतात. ज्या आयुष्यातही उपयोगी पडणाऱ्या आहेत. मी नेहमी मुलींना म्हणते, पाच हजार रुपये महिना देऊन तासभर जिममध्ये जाऊन सायकल चालवायची आणि गॉसिप करायचं, यापेक्षा आठवड्यातून दोन दिवस तुम्ही नृत्यवर्गाला गेलात तर खूप उपयोग होईल. कारण प्रशिक्षणात विचारही आहे. त्यात मनाची इन्व्हॉल्वमेंट आहे. चित्ताची आहे, बुद्धीची आहे. पुढे तुम्ही परफॉर्मर व्हा, संरचनाकार (कोरिओग्राफर) व्हा, शिक्षक व्हा तो पुढचा अगदी वेगळा भाग आहे. तरीसुद्धा नृत्य आपल्या जीवनाचा भाग होणे ही मला खूप सुंदर गोष्ट वाटते. त्याची बीजं आता रुजलेली तर आहेतच त्याची रोपंही वाढताना दिसताहेत. तरुण पिढी त्याचा नक्की पाठपुरावा करेल, याबद्दल माझ्या मनात तरी खूप आशा आहेत. त्याप्रमाणे होईल असं मला नक्कीच वाटतं. या नृत्यदिनाच्या निमित्ताने मी सर्व अभिजात नृत्याची साधना, उपासना करणाऱ्यांना खूप शुभेच्छा देते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून गेली साठ वर्षं मी ही साधना करत आले आहे. ती शेवटपर्यंत करण्याची ऊर्जा ईश्वर मला देवो, अशी प्रार्थना करते.

डॉ. सुचेता भिडे चापेकर

अन्य लेख

संबंधित लेख