लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लातूर लोकसभा (Latur Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दुपारी लातूरमध्ये (Latur) जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले कि ‘या भागाला पाणीदार आणि सुजलाम सुफलाम करायचे असेल तर महायुतीचे हात बळकट करावे. काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले आहेत’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सुर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उध्वस्त करून महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न सेट केला आहे. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील’. तसेच लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही’ असेही यासमयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘आपल्या देशाला आता स्थिर सरकारची खरी गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनगटात आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करावे. आपल्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे’, असा टोला लगावला.