काठमांडू : नेपाळच्या उत्तरेकडील भागात आज सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात, नेपाळचे “पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती दिली आहे. नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असेही आपल्या संदेशांत म्हटले आहे.
नेपाळला सर्वतोपरी मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे. आमची पथके बचाव आणि मदत कार्याबाबत जवळून समन्वय साधत आहेत. असेही मोदी यांनी आपल्या संदेशांत म्हटले आहे. नेपाळमध्ये आज आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे (flash floods) बाधित झालेल्या भारतीय नागरिकांविषयी मदत आणि माहिती मिळवण्यासाठी खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधता येईल असे भारतीय परराष्सांट्गिर व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.
रासुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला असून, भोटे कोशी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भोटे कोशी नदीला अचानक पूर आला. हा पाण्याचा प्रवाह तिबेटच्या दिशेने आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. नदीच्या अचानक वाढलेल्या प्रवाहामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
बचाव आणि मदतकार्याला सुरुवात
पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांच्या जवानांना बचाव व मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
दरम्यान, पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढील आवश्यक उपाययोजनांबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे रासुवा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली असून, बचाव पथकांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.