राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात अमेरिकेत पोहोचले आहेत… त्यांचा हा अमेरिका दौरा संघाच्या १०० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संपर्क कार्यक्रमाचा एक भाग आहे…
सरसंघचालक न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात सुमारे ५ हजार भारतीय वंशाच्या अनिवासी नागरिकांना संबोधित करणार आहेत…
या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या ‘अहेड फोरम’ (AHEAD Forum) ने सोशल मीडियावर माहिती दिली की… सरसंघचालक, शनिवार २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’ (Universal Oneness) सोहळ्याला उपस्थित राहतील… “हे संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हाच सार्वकालिक संदेश या कार्यक्रमाचा मूळ गाभा आहे. कृत्रिम भेदभावाच्या पलीकडे जाऊन मानवी एकतेचे नाते जपणे आणि परस्पर आदर व सौहार्दाची भावना वाढीस लावणे हा यामागचा उद्देश आहे,” असे आयोजकांनी म्हटले आहे.
हिंदूज फॉर ह्युमन राइट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क यांसारख्या अनेक आंतरधर्मीय आणि नागरी हक्क संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध करत न्यूयॉर्क सिटी हॉलबाहेर निदर्शने केली… आणि मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले…
डेमोक्रॅटिक पक्षाचे आणि धर्माने मुसलमान असलेले न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांना… पत्रकार परिषदेत संघाचे सरसंघचालकांचा मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील नियोजित कार्यक्रम रद्द करावा का? असा प्रश्न विचारण्यात आला… त्यावर ममदानी यांनी… मी या रॅलीला पाठिंबा देत नाही, पण एखादा खाजगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार आहे की नाही हे मला माहीत नाही… (आणि तसा अधिकार न्यूयॉर्कच्या महापौरांना नाही, हे निश्चित)… कोणत्याही देशात बहिष्कार आणि भेदभावावर आधारित चळवळींचा उदय होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे… अशा विचारसरणीला केवळ एक भारतीय-अमेरिकन म्हणूनच नव्हे, तर प्रत्येक धर्म, वर्ण आणि जातीच्या लोकांच्या अस्तित्वाचा आणि हक्कांचा आदर करणाऱ्या शहराचे महापौर म्हणूनही मी तीव्र विरोध करतो… असे सांगितले…
“मी या शहराचा पहिला भारतीय वंशाचा महापौर म्हणून येथे उभा आहे… माझ्या आईचे कुटुंब अजूनही भारतातच राहते. माझ्या कुटुंबाने मला भारताच्या ज्या संस्कृतीची ओळख करून दिली आणि लहानाचा मोठा होताना मी जो भारत पाहिला, तो विविधतेने नटलेला आणि सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भारत होता; जिथे प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि आपुलकीची भावना मिळते…
एखाद्या देशाला किंवा घटकाला डावलणाऱ्या विचारसरणीचा प्रसार चिंताजनक आहे… अशा विचारसरणीला माझा तीव्र विरोध आहे-केवळ एक भारतीय वंशाचा नागरिक म्हणून नाही, तर रंग, धर्म, जात किंवा वंशाचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि आदराचा सन्मान करणाऱ्या न्यूयॉर्क शहराचा महापौर म्हणूनही मी याला विरोध करतो”… अशी (अनावश्यक) पुस्तीही त्यांनी जोडली…
वास्तविक या कार्यक्रमाच्या आयोजकांनी… ‘अहेड फोरम’ ने स्पष्ट केल्याप्रमाणे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या शाश्वत विचारावर आधारित सरसंघचालकाचा हा जागतिक प्रवास केवळ सर्वसमावेशक सौहार्द आणि सांस्कृतिक एकतेसाठी आहे… त्यामुळे काही घटकांकडून भीती किंवा गैरसमज पसरवण्याचे केले जाणारे प्रयत्न पूर्णपणे निराधार आहेत…
कोणताही द्वेष पसरवणे हा या दौऱ्याचा उद्देश नसून जागतिक एकता आणि मानवतेला एकत्र आणणे हा आहे. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील या शांततापूर्ण आणि सांस्कृतिक उपक्रमाला चुकीच्या पद्धतीने मांडून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे…
सरसंघचालक ज्या सनातन “सांस्कृतिक हिंदुत्वा”च्या विचारधारेचे सर्वोच्च नेतृत्व करतात ती विचारधारा… “इतिहासाला ज्ञात असलेल्या पहिल्या मानवापासून किंवा मानवाला ज्ञात असलेल्या इतिहासाच्या पहिल्या दिवसापासून”…
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥…
याचेच चिंतन करत आली आहे… हिंदुत्वाच्या विचारधारेने या विश्वाचा “सर्वे” (Universal Oneness)… सगळे असाच विचार केला आहे… यात विभाजित (Compartmental) विचारांना कुठेही स्थान नाही… जे आहे ते एकात्म (Integrated) आहे…
भारताचे माजी पंतप्रधान आणि रा. स्व. संघाचे आजीवन प्रचारक स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना… “मी जेव्हा भारतीय शब्दाचा उच्चार करतो तेव्हा मी या विश्वाशी जोडला जातो परंतु जेव्हा मी हिंदू या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा मी ब्रह्मांडाशी जोडला जातो”… असे भारतीय आणि हिंदू या दोन समानार्थी शब्दांचे मार्मिक विवेचन केले होते…
सरसंघचालक ज्या शाश्वत विचारधारेचे प्रतिनिधीत्व करतात ती विचारधारा…
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥… महाोपनिषद (अध्याय ४, श्लोक ७१)
अर्थात्… “हे माझे आहे आणि हे दुसऱ्याचे आहे, असा विचार किंवा हिशोब लहान हृदयाचे (संकीर्ण मनाचे) लोक करतात… याउलट, उदार हृदयाच्या महान लोकांसाठी ही संपूर्ण पृथ्वी एका कुटुंबासारखी आहे.”… असे मानणारी आहे… “वसुधैव कुटुम्बकम्” अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर “हे विश्वची माझे घर” मानणारी आहे…
“मनसैवानुद्रष्टव्यं नेह नानाऽस्ति किंचन।
मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ।।” (बृहदारण्यक उपनिषद् ४-४-१९)…
या ब्रह्मांडात नानात्व (अनेकत्व) नाहीच… हीच आमच्या विचारधारेची धारणा आहे… आमच्या या सनातन हिंदुत्वाच्या “अद्वैत” विचारधारेत… या ब्रह्मांडाचा एकत्वाने (Universal Oneness) विचार करून त्याचा तुकड्याने (Compartmental) विचार करणे पूर्णपणे नाकारले आहे…
आणि याच्याही पुढे जाऊन “एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति”… अर्थात् “सत्य एकच आहे, ज्याला ज्ञानी किंवा विद्वान लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात” अशी आमची दृढ धारणा आहे…
ही एकात्मतेची… सर्वसमावेशकतेची… Universal Oneness ची विचारधारा आमच्यासाठी केवळ पाठांतर किंवा पोपटपंची नाही… तर ती आमची जीवनशैली आहे…
कुणाला खात्री करून घ्यायची असेल तर भारतातील यहुदी (ज्यू) आणि पारशी बांधवांना ते जरूर विचारू शकतात… आपला प्राणप्रिय धर्मवासावण्यासाठी मातृभूमीतून परागंदा झालेल्या यहुदी (ज्यू) आणि पारशी बांधवांना “वसुधैव कुटुम्बकम” मानणाऱ्या हिंदू समाजाने दुधात साखर मिसळावी कसे आपल्यात विरघळवून टाकले… त्यांच्या धार्मिक श्रद्धांना कुठेही तडा न देता… त्यांचे धार्मिक वेगळेपण टिकवून देखील ते आज भारतीय समाज जीवनाशी एकरूप झाले आहेत…
आणि नेमकी हीच अमृतासारखी “सर्वसमावेशक” अमर अजरामर विचारधारा… अमेरिकेतील भारतीय वंशाच्या बंधू भगिनींसमोर व पर्यायाने सगळ्या जगासमोर ठेवण्यासाठी सरसंघचालकांचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे…
त्यामुळे जोहरान ममदानी आणि या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या संस्थांचा एकूणच थयथयाट हा अनाठायी आणि अनाकलनीय आहे… कदाचित त्यांची भीती वेगळीच असावी…
११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो सर्वधर्म परिषदेत… स्वामी विवेकानंदांनी “Sisters and Brothers of America” म्हणून ती परिषद व अमेरिकेची मने जिंकली होती… अमेरिकन जनतेच्या अंत:करणात आजही त्याचे पडसाद उमटत आहेत…
कदाचित सरसंघचालक हे त्यांच्या दृष्टीने… “Another Hindu monk after Swami Vivekanand” ठरतील व त्यांच्या वैचारिक अमृतधारेची छाप अमेरिकन जनतेवर शतकभर तरी राहील ही त्यांची भीती असावी…