आधुनिक जगतात पत्रकारांची भूमिका ही सल्लागाराची, संवादकांची व घटनांवर परिणाम करणाऱ्यांची असते. इतिहासात नेमकी हीच भूमिका नारदांनी बजावलेली आहे. नारद जयंती आद्य पत्रकारिता दिन म्हणून विश्व संवाद केंद्रातर्फे साजरी
देवर्षी नारद यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने पत्रकारांना सन्मानित करण्याचे कार्यक्रम आयोजिले जातात. देवर्षी नारद यांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात. माध्यमांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्र, भाषणे याचेही आयोजन केले जाते. दरवर्षी नारद जयंती आद्य पत्रकारिता दिन म्हणून विश्व संवाद केंद्रातर्फे साजरी केली जाते. देशात अनेक ठिकाणी विश्व संवाद केंद्रातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
देवर्षी नारद हे ब्रह्मदेवांचे पुत्र. भगवान श्री विष्णुंचे एकनिष्ठ अनुयायी आणि बृहस्पतीचे शिष्य म्हणून पूजनीय आहेत. त्रिभुवनातील अथक भटकंतीमुळे निःस्वार्थी संदेशवाहक, लोककल्याणहितैषी म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. ते एक महान विद्वान होते, संगीतकार होते, नारायणांचे भक्त होते. त्यांनी भक्ती स्तोत्रे रचली. ते उत्तम जनसंवादकही होते. सर्वत्र भ्रमण करणारे ते एक पत्रकारच होते असे म्हणता येईल. हा इतिहास असताना त्यांची समाजमानसापर्यंत जी माहिती पोहोचवली गेली ती अगदीच उलट्या स्वरूपाची आहे. चित्रपट क्षेत्राने त्यांच्याबद्दलची चुकीची माहिती पसरवली.
वास्तविक आद्य पत्रकार हीच त्यांची ओळख सांगता येईल. ब्रह्मदेवांकडे यथातथ्य वृत्तनिवेदन करणे आणि वृत्त प्रसारित करणे हे नारदांच्या जीवनाचे प्रमुख कार्य होते. देवर्षी नारदांच्या कोणत्याही संवादाने देश वा समाज दुखावला नाही.
सध्याच्या माध्यमक्षेत्राचा विचार केला तर माध्यमांचे स्वरूप सातत्याने बदलताना दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे माध्यमांमध्ये अनेक बदल होत आहेत. लोकप्रबोधन, लोकशिक्षण, लोकजागृती, लोकानुरंजन हे माध्यमांचे कार्य आहे. हेच कार्य आज पत्रकारितेकडून किंवा माध्यमांकडून होणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक दिलिप करंबेळकर यांनी या विषयासंबंधीचे फार सुरेख विवेचन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विद्याधऱ ताठे यांनी लिहिलेल्या भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा पूर्वज आद्यपत्रकार देवर्षी नारद (प्रकाशक – स्नेहल प्रकाशन) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत करंबेळकर यांनी हा विषय समाजावून दिला आहे. ते म्हणतात, नव्या परिस्थितीत एका वेगळ्या कारणासाठी पत्रकारितेचे महत्त्व अबाधित राहू शकते. समाजमानस घडविण्याबरोबरच अनेक पत्रकारांनी एक वेगळी भूमिकाही बजावली आहे. राजकीय व सामाजिक नेते आपापल्या विचारानुसार समाजमानस घडवून आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना या समाजप्रवाहातील तरंगांचे पत्रकार निरीक्षण करीत असतो. त्यामुळे प्रत्यक्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात लढणारे योद्धे असतात त्यांना आपल्या युद्धभूमीचे स्वरूप समजण्याकरिता असे निरीक्षण आवश्यक असते. अशा वेळी पत्रकारांचा याबाबतचा अनुभव उपयोगी पडतो. त्याचबरोबर या युद्धात प्रत्येक योद्ध्याने एक भूमिका घेतलेली असते. त्यामुळे त्याला आपल्या स्थानावरून उतरून दुसऱ्या योद्ध्याशी संवाद करता येत नाही. त्यात त्याची प्रतिष्ठा गुंतलेली असते. अशा प्रसंगीही पत्रकार संवादकाची भूमिका पार पाडत असतात. त्याचबरोबर आपल्या अनुभवाच्या आधारे समाजहिताच्या दृष्टीने काही गोष्टी घडाव्यात किंवा घडू नयेत असे समाजहिताबद्दल आस्था असणाऱ्या पत्रकारांना वाटत असते. त्या दृष्टीने समाजप्रवाहावर परिणाम करणारे घटक शोधून काढून त्यांच्या आधारे ते एखादी घटना घडवितात किंवा घडण्याचे थांबवितात. त्यामुळे आधुनिक जगतात पत्रकारांची भूमिका ही सल्लागाराची, संवादकांची व घटनांवर परिणाम करणाऱ्यांची असते. इतिहासात नेमकी हीच भूमिका नारदांनी बजावलेली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माध्यमांचा पसारा वाढत असताना, नवे तंत्रज्ञान येत असताना सध्याची माध्यमे, त्यांच्या समोरील आव्हाने आणि माध्यमांकडून अपेक्षा याचाही विचार करू या.
ज्येष्ठ पत्रकार सत्यजित जोशी यांचा पत्रकारितेशी गेल्या चार दशकांचा संबंध आहे. माध्यमांसमोरची आव्हाने याबाबत बोलताना ते म्हणाले, संगणक येण्यापूर्वीपासूनच्या पत्रकारितेचा मी एक साक्षीदार आहे. संगणकाने हळूहळू पत्रकारितेला कधीही न सुटणारा विळखा घातला आहे. सध्याच्या टप्प्यावर सर्वात मोठे आव्हान artificial intelligence चे आहे. हे धक्कादायक नाही. Artificial intelligence हे संगणकीकरणाचेच extension आहे. तथापि, artificial intelligence मुळे मानवी बुद्धीला आणि सर्जनशीलतेला अभूतपूर्व आव्हान मिळणार आहे. हा प्रश्न केवळ बेकारी किंवा नवीन रोजगाराची संधी एवढ्यापुरता मर्यादित नाही. पत्रकारितेचे स्वरूप संपूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता artificial intelligence मध्ये आहे.
हे बदल केवळ तांत्रिक नसतील तर त्याचा प्रत्यक्ष संबंध editorial content शी असेल. हा बदल वाचक मान्य करणार का, हा कळीचा प्रश्न आहे. Artificial intelligence चा मजकूर या क्षणाला तरी कोरडा किंवा भावनाशून्य वाटतो. वाचकाला तो भावेल का, याचे उत्तर भविष्यात दडलेले आहे. परंतु अत्यंत थोड्या काळात हे बदल अपेक्षित आहेत. देशातील एका प्रमुख माध्यम समूहाने artificial intelligence वापरायला प्रारंभ केला आहे. पत्रकारांवर अजून सक्ती नाही. परंतु ते अटळ दिसते. हा बदल हळूहळू आणला जाईल. कारण वाचकाला एकदम दिलेला धक्का कदाचित पचणार नाही. Artificial intelligence ने निर्मित केलेला मजकूर माझ्या समजुतीप्रमाणे अपेक्षित गुणवत्ता गाठू शकणार नाही. त्याचा गैरवापर आणि समाजावर होणारा परिणाम, हा पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. वर्तमानातील पत्रकारितेचा समाजावर प्रत्येक क्षणी परिणाम होत असतो. Artificial intelligence मुळे होणारे परिणाम समाज हितकारी असतील का, या विषयी मला शंका आहे, असेही मत जोशी यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियाचे अभ्यासक विवेक मंद्रूपकर म्हणाले, सोशल मीडिया हे अनेकांसाठी प्रभावी माध्यम आहे. अन्य माध्यमांच्या तुलनेत याच्या वापराला कमी खर्च येतो. तसेच या माध्यमाचे प्रेक्षकही अन्य माध्यमांच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे सामान्य माणसाच्या हातातले माध्यम बनले आहे.
सोशल मीडिया या संकल्पनेमध्ये अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. सध्या फेसबुक आणि instagram यांना सर्वाधिक प्रेक्षक लाभला आहे. या दोन माध्यमांवर तुम्ही दृकश्राव्य पद्धतीने माहिती देऊ शकता. मनोरंजनात्मक कन्टेन्ट अधिक पाहिला जातो. तसेच विविध प्रकारच्या पाककृती, आरोग्य, गुंतवणूक आदी विषयांचे व्हिडिओ किंवा रिल्स देखील मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. सोशल मीडियाद्वारे एखादा विषय समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी फारशी साधने लागत नाहीत. ट्रायपॉड कॅमेरा आणि एडिटिंगची सुविधा असली की अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवता येतात. कॅमेरा हाताळणे, रंजक पद्धतीची स्क्रिप्ट असणे, ही कौशल्य यासाठी आवश्यक आहेत. एखाद्या उत्पादनाच्या प्रचारापासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत सर्वत्र सोशल मीडिया मुक्तपणे हाताळला जातो. सत्यता तपासून पाहणे हे मात्र सोशल मीडियातील कंटेंट समोरचे आव्हान आहे, याकडेही मंद्रुपकर यांनी लक्ष वेधले. माहितीपर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ केल्यास लोकांची पसंती मिळते हे आतापर्यंत दिसून आले आहे असेही त्यांनी सांगितले.