Friday, October 18, 2024

शिवकालीन वाघनखे साताऱ्यात दाखल; शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share

सातारा : शिवकालीन महाराष्ट्र (Maharashtra) हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे (WaghNakh) साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत, हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशनकुमार शर्मा, आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंट, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, वृषालीराजे भोसले, पुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते. यावेळी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. विविध योजना शासन राबवित असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गड-कोट किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १५० कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूषा महाराणी ताराबाई यांच्या संगममाहूली येथील समाधीस्थळाचा जीणोद्धार राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अन्य लेख

संबंधित लेख