Sunday, November 24, 2024

शिवरायांचे कर्तृत्व सांगणारी शिवसृष्टी

Share

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीची ही ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि उत्तम प्रशासक होते. शिवाजी महाराजांची स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची भावना अतिशय जागरूक होती. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. शिवकालीन घटनांमुळे भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला. त्या घटना अंगणवाडीपासून ते महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच भारतीय जनमानसावरही त्या ठसाव्यात आणि आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पावलावर प्रेरक ठरावेत हीच आपणा सर्वांची अपेक्षा आहे.

तर मग अशी कोणती गोष्ट आहे जी आपणा सर्वांसाठी प्रेरक ठरेल ? शिवरायांवरील पुस्तके, ग्रंथ, गड-किल्ले, चित्रपट, बखरी… नक्कीच या सर्वांमधून आपल्याला प्रेरणा मिळते. पण जर असे एखादे ठिकाण असेल की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळच तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहत असेल तर… असे एकमेव ठिकाण म्हणजे पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी.

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समृद्ध इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्याची तळमळ असलेल्या स्वर्गीय छत्रपती राजमाता सुमित्रा राजे भोसले यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली ७ एप्रिल १९६७ रोजी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आपल्या संपूर्ण आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट सात समुद्रापलीकडे नेणारे, दूरदृष्टी आणि बांधिलकी दाखवणारे दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतलेल्या समर्पित परिश्रमामुळे ही शिवसृष्टी आज उभी आहे.

आदरणीय बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणत ,”इतिहासाच्या अनुभवावरून आपल्या महान राष्ट्राला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक पिढीला त्यांचे राष्ट्रीय चारित्र्य विकसित करावे लागेल. त्यासाठी आदर्श मूल्ये आणि नैतिकता आपल्या तरुणांमध्ये रुजवली पाहिजे. हे महत्कार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन इतिहास मोठा स्त्रोत आहे. इतिहास आपल्याला जगाची जाणीव करण्यास मदत करतो आणि योग्य – अयोग्य यांचे धडे देतो.”

हा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवसृष्टीला भेट दिलीच पाहिजे. शिवसृष्टीमधील सर्व दालने पाहण्यासाठी ३ तास लागतात त्यानुसार आपल्या भेटीचे नियोजन केल्यास शिवसृष्टी पाहण्याचे समाधान आपल्याला मिळेल. आठवड्याचे सातही दिवस शिवसृष्टी सुरु असते. शुक्रवारपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत तर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत शिवसृष्टीमधील दालने पाहता येतात.

आपण पुण्याच्या कोणत्याही भागात असलात तरी आपण सहजपणे आंबेगाव इथल्या शिवसृष्टीमध्ये पोहोचू शकाल. स्वारगेट आणि डेक्कन या ठिकाणांहून पीएमपीच्या शहरी बस सेवा उपलब्ध आहेत. कात्रजच्या प्राणी संग्रहालयापासून केवळ पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर शिवसृष्टी आहे. त्याचबरोबर रिक्षा, ओला, उबर यांसारख्या खाजगी वाहतूक सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत. कात्रजहून वाकडच्या दिशेने जाणा-या कोणत्याही सार्वजनिक वाहनाने तुम्ही शिवसृष्टीच्या अगदी समोर उतरू शकता.

शिवसृष्टी निर्माण करताना तिथे येणाऱ्या प्रत्येकाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील हा विचार करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर इमारतीत स्वच्छतागृहे, दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर आणि लिफ्ट उपलब्ध असून पुरेशी पार्किंगची जागादेखील उपलब्ध आहे. कॅफेटेरियामध्ये स्नॅक्स, चहा आणि कॉफी उपलब्ध असते.

बुक माय शो बरोबरच आपल्याला शिवसृष्टीच्या तिकीट केंद्रावरदेखील तिकिटे मिळू शकतील. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी यांच्यासाठीदेखील गट आरक्षणाची सोय उपलब्ध आहे. २५ आणि त्यापेक्षा जास्त संख्येने असणा-या गटांसाठी तिकिटात विशेष सवलत आहे. मराठी आणि हिंदीत माहिती सांगणारा मार्गदर्शक संग्रहालयात उपब्लध आहे.

किल्ल्यांची इत्थंभूत माहिती
दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केले. गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके आहेत. तेच गड आणि किल्ले आधुनिक स्वरुपात त्यांच्या योग्य त्या माहितीसह शिवसृष्टीत पाहायला मिळतात. त्रिमितीय स्वरूपातील किल्ले विशेष आनंद देतात. तंत्रज्ञानाच्या वापराने, किल्ल्याचा प्रत्येक भाग प्रकाश आणि दृश्यांसह स्थित आहे आणि कथेचा ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व दर्शविण्यात आले आहे. या किल्ल्यांची संरचना, संरक्षण व्यवस्था, पाणी व्यवस्थापन आणि सांस्कृतिक पैलूंबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता.

रणांगण दालन
रणांगण या दालनात १७ व्या शतकातील मूळ चित्रांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. यामध्ये शिवाजी महाराजांच्या शत्रूंचे चित्रण आहे. ही चित्रे हेग म्युझियम, नेदरलँड्स आणि बिब्लिओथिक फ्रान्समधील विट्सन अल्बममध्ये प्रदर्शित केलेल्या मूळ संग्रहांची अस्सल पुनरुत्पादने आहेत.

श्रीमंत योगी – आज्ञापत्र, आग्र्याहून सुटका हे प्रसंग, शस्त्रदालनात तलवार, कट्यार, बिचवा, भाला, दांडपट्टा, वाघनखं, खंजीर, गुप्ती यांसारखी खरीखुरी शस्त्रे पाहायला मिळतात. सिंहासनाधीश्वर : राज्याभिषेक या भव्य दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याची संधी मिळते. शिवाय तलाव आणि भवानी मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

समकालीन समाजाची ओळख नेहमी भूतकाळाशी जोडलेली असते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना मराठा इतिहासाची ओळख होणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि इतिहास याविषयीचे ज्ञान समाजात जतन करणे, त्यांचा प्रचार करणे हेच ध्येय ‘शिवसृष्टी’ च्या माध्यमातून ठेवले आहे.

शिवसृष्टीला भेट देऊन आपल्या राजांचे स्वराज्य आणि त्यांचे कर्तृत्व जाणून घेऊन आपल्या जीवनात शिवरायांच्या विचारांमधील एक जरी विचार मनात ठेऊन तो विचार आपल्या वागणुकीतून कृतिरूप केला तर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना ती खरी आदरांजली ठरेल.

अनुभवण्या मराठ्यांच्या रक्ताची क्रांती,
पावनखिंडीला नमन करण्यासाठी
छत्रपती शिवरायांना, स्वराज्याच्या मावळ्यांना
अभिवादन करण्यासाठी
राखूयात थोडावेळ पुण्यातील शिवसृष्टीसाठी !!!

प्रशांत जाधव
(लेखक पुण्यातील मा.स. गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख