Sunday, September 8, 2024

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल

Share

१८५७ या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या समयी तंट्या मामाचा परिचय सेनापती तात्या टोपे यांच्याशी झाला. दोन ध्येयवेडे एकत्र आले. तंट्याची सेना त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यास तयार केली. तंट्या (मामा) भिल्ल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख.

विविध भाषांमधील चित्रपटात दाखवली जाणारी अनेक दृश्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती काल्पनिक आहेत का त्या त्या लेखकाच्या प्रतिभेने अवतरली आहेत का असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. कधीतरी नकळत त्यातील एखादे दृश्य एखाद्या चित्राशी, ऐतिहासिक प्रसंगाशी, पुरातन कथेशी अथवा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याशी संबधित आहे, असे आपणाला जाणवत राहते. चरित्रात्मक कथेशी निगडित दृश्याशी आपण एकरूप होऊन जातो.

उदाहरणार्थ, एका पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती येते आणि ती त्या अधिकाऱ्याला सूचना देते की, ज्या व्यक्तीला तुम्ही शोधत आहात त्याला मी पकडून देतो. पोलीस हवालदार आपल्या दोन बंदुका घेऊन त्या माणसाच्या मागोमाग जातात. ते जंगलामध्ये गेल्यानंतर तो सांगतो ज्याला तुम्ही शोधत आहात तो मीच आहे. आता बऱ्या बोलाने बंदूक माझ्या ताब्यात द्या नाहीतर तुमची काही खैर नाही. असाच प्रसंग जसाच्या तसा आपल्याला कोणाच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो, तर ज्याचा उल्लेख इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून गौरवाने केला त्या तंट्या भिल्ल याच्या जीवनामध्ये आपल्याला असा प्रसंग पहायला मिळतो.

स्फूर्तिदायक, प्रेरणादायी चरित्र
कोण होता तंट्या भिल्ल, त्याला तंट्या मामा का म्हणायचे आणि इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून त्याला का संबोधले. तर अशा एका महान जनजाती शूर वीराची ही कहाणी आहे. वर्तमान मध्य प्रदेशच्या निमाड क्षेत्रामध्ये १८५० ते १८८९ या ४० वर्षांमध्ये ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, आपल्या पराक्रमाने आणि भिल्ल जातीच्या एकलव्य बाण्याने परकीय सत्तेच्या म्हणजे इंग्रजांच्या विरोधात, त्याच बरोबरीने शोषण करणाऱ्या सावकार आणि जुलमी जमीनदार यांच्या विरोधात सशस्त्र मुकाबला आपल्या शूरवीर बांधवांना संघटित करून केला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आणि सावकारांच्या शोषण व्यवस्थेतून आपल्या क्षेत्राला दोन दशके मुक्त केले त्या तंट्या भिल्लाचे चरित्र हे अत्यंत स्फूर्तिदायक, प्रेरणादायी आणि तत्कालीन क्रांतीकारक, शूरवीरांच्या तोडीचे आहे.

लहानपणीच आई वडिलांच्या झालेल्या हत्येच्या विरोधात अन्यायाने पेटून तंट्या उभा राहिला. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी तंट्याला सर्व बाबतीमध्ये प्रशिक्षित केले. यामध्ये गोफण फिरवणे, अचूक बाण मारणे, तलवार चालवणे, बंदूक चालवणे असे प्रशिक्षण त्याला मिळाले. भिल्ल जनजाती समाजाचा असल्यामुळे मुळातच शरीर अत्यंत काटक होते. गिरीकंदात, निसर्गाच्या सान्निध्यात, नर्मदा मय्येच्या भोवती बालपण व तारुण्य गेल्यामुळे काठीणतम डोंगर चढणे, दुथडीवर भर वाहणारी नदी भर पुरात पार करणे हा तंटाच्या हातचा खेळ होता.

अशा अनेक गोष्टी करता करता सावकारांच्या विरोधात तंट्याने आपल्या सोबत नवयुवक तयार करत त्यांची एक सशस्त्र फलटण उभी केली आणि सावकारांना धमकवण्यास सुरुवात केली. जे जे गरीब जनतेवर अन्याय करत होते, शोषण करत होते त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली. अनेक सावकारांची घरे लुटून तंट्या भिल्ल याने ती संपत्ती स्वतःकडे न ठेवता गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली. त्यामुळे हा देवाने पाठविलेला आपला तारणहार आहे अशी एक भावना समाजामध्ये निर्माण झाली.

विशेष करून महिलांच्या संरक्षणामध्ये तंट्याने आपली सत्शील नीतीमत्ता आणि सैन्य उभे केले. त्यामुळे प्रेमाने अनेक भगिनी त्याला आपला भाऊ म्हणू लागल्या. त्यामुळे अनेकांचा तो मामा झाला. आपण पाहतो की मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनाही मामा म्हटले जायचे. कारण त्यांनीही बहिणींसाठी अनेक योजना राबवल्या. ते मामापण खरेतर तंट्या मामाशीच भावनिक पद्धतीने जोडलेले आहे.

इंग्रजांविरुद्ध संघर्ष
१८५७ या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या समयी तंट्या मामाचा परिचय हा सेनापती तात्या टोपे यांच्याशी झाला. दोन ध्येयवेडे एकत्रित आले. सावकारांच्या विरोधामध्ये लढणारी तंट्याची सेना त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यास तयार केली. त्यानंतरचा पुढचा कालखंड जर आपण पाहिला तर तंट्या मामा हा इंग्रजांच्या विरुद्ध शेवटपर्यंत प्राणपणाने लढला. जंगल, पहाड, नदी याचा आधार घेत ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी पद्धतीने संघर्ष केला त्याच गनिमी काव्याने त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी हरप्रकारे प्रयत्न करूनही तंट्याला पकडणे शक्य होत नव्हते. एक वेळ अशी आली की त्याला पकडण्यासाठी इंग्रजांना विशेष अशी तंट्या ब्रिगेड निर्माण करावी लागली.

१८५८ मध्ये खोट्या चोरीच्या आरोपांमध्ये इंग्रजांनी तंट्याला पकडले. परंतु मुझे कोई दिवार बंदिस्त नही कर सकती असे म्हणत तंट्या आणि त्याचे साथीदार जेलमधून इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. कदाचित इंग्रजांच्या मगर मिठीतून सुटणारा व पुढे जबलपूरच्या जेलमधून आपल्या सहकाऱ्यांना सोडवणारा तंट्या हा एकमेव क्रांतिकारक असेल.

इंग्रजांच्या सर्व पर्वतीय मार्गाच्या व्यापारावर तंट्या भिल्ल सक्त पहारे ठेवले. अनेक वेळा खजिना लुटणे, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना ठार मारणे त्यातही ऐतद्देशिय शिपायांना पकडून सोडून देणे हे वारंवार होऊ लागल्यामुळे इंग्रजांनी काही काळ आपला व्यापारही तेथे बंद केला. निमाड क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने, आपल्या पराक्रमाने व आपल्या दयाशील दानशूर वृत्तीने जनतेमध्ये भगवानाच्या रूपामध्ये त्याची पूजा होऊ लागली.

जनतेच्या गळ्यातील तो ताईत झाला. त्यामुळे इंग्रज अत्यंत हतबल झाले. परंतु इंग्रज फारच हुशार व धोरणी होते. त्यांना असा शत्रू परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी काही काळ जरी माघार घेतली तरी त्यांनी तंट्याला काहीही करून पकडायचे ठरवले होते. रणांगणावर किंवा वीरतेने आपण तंट्याला पकडू शकत नाही हे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे आपले पाताळयंत्री धोरण अवलंबून अशाच एका मानलेल्या बहिणीच्या नवऱ्याला फितवून भाऊबीजेच्या दिवशी तंट्याला पकडले व चौकशीचे नाटक करत 4 डिसेंबर 1889 रोजी फाशीवर चढवले. त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन न करता दूर रेल्वेच्या स्थानकाजवळ फेकून दिला.

एवढी दहशत ज्यांनी इंग्रजांमध्ये निर्माण केली, दुर्दैवाने त्या तंट्या मामाची ओळख मध्य प्रदेशच्या काही क्षेत्रात सोडली तर समग्र भारताला आजही नाही. किंबहुना अशा जवळजवळ 150 जनजाती वीरांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देव, देश, धर्मासाठी आपले सर्वस्व बलिदान केले.परंतु त्यांचे नामो निशाण कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही.

नवा कालखंड सुरू झाला आहे…
इतिहासाच्या पानावर आजही या सर्वांचा उल्लेख हा दरोडेखोर, भिल्ल, रानटी, आदिवासी असाच केला जातो आणि आम्हीही हा पराक्रमाचा इतिहास दुसऱ्यांच्या चष्म्यातून पाहतो, ऐकतो आणि तसाच सांगतो. परंतु परिस्थिती बदलत चाललेली आहे. अशा सर्व वीरांचा येथोचित गौरव करण्याचा, त्यांना पुन्हा आठवण्याचा कालखंड सुरू झालेला आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे प्रयत्न
याच प्रयत्नांमध्ये अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सामाजिक संघटना ज्या वनक्षेत्रात काम करतात त्यांनी अशा वीरांची माहिती संकलित केली. त्यांच्यावर छोट्या, मोठ्या पुस्तिका बनवल्या गेल्या. या सर्वांचा उपयोग होऊन राष्ट्रीय जनजाती आयोग आणि भारत सरकारने अमृत काळामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन हा सर्व इतिहास पुढे आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.

यानिमित्ताने अशा सर्व अज्ञात शूरवीरांची माहिती देणारे लिखाण झाले. भाषणे, प्रवचने झाली. त्यांच्या जीवनावर प्रदर्शनी वेगवेगळ्या ठिकाणी लावली गेली. आतापर्यंत हा स्फूर्तिदायी इतिहास आपल्यापासून लपून ठेवण्यात आला होता. परंतु या अमृत महोत्सवच्या काळामध्ये हा इतिहास सर्व माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे. त्यामुळे तो प्रेरणादायी इतिहास आपणही पुढे घेवून जाण्यास मदत करावी. जनजाती किंवा अशा वीरांचा इतिहास लोकांपर्यंत यावा ह्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. हे अत्यंत स्तुत्य आहे.

शरद जयश्री कमळाकर चव्हाण
(लेखक अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख