Saturday, November 23, 2024

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

Share

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे शिवसृष्टी (Shivsrushti) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे न्यावी. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे. तहसीलदार आबा महाजन, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शिवाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा हा येवला शहरात असून ही येवलावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. नाशिक शहरातही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य अर्धशिल्प बसिवण्यात आले आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

‘शिवसृष्टीची रचना साकारण्यात आली आहे. शिवसृष्टीचे प्रवेशद्वारही आकर्षणाचा एक महत्त्वाचा घटक असून सागवानी लाकडापासून ते तयार करण्यात आले आहेत. जांभा दगड व काळा दगड व राजस्थान येथील चांगल्या प्रतीच्या दगडांचा उपयोग येथे करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना येथे चित्र व माहिती ही ऑडीओ व व्हिडियो स्वरूपात येथे नागरिकांना पहावयास व ऐकावयास मिळणार आहे. शिवकालीन ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन येथे भरविले जाणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वी जयंती वर्ष आपण यावर्षी साजरे केले. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचा आदर्श मनात बाळगून आपण सर्वांना पुढे वाटचाल करावयाची आहे. शिवाजी महाराजांसोबत अठरा पगड जातीतील लोक सरदार म्हणून काम करत होते. त्यांचे शौर्य आजही इतिहासात अधोरेखित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना मूलभूत अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा उपयोग आपण प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहीजे. नव्या पिढीला महाराजांचे शौर्य, धैर्य, पराक्रम, आदर्श, राज्यकारभाची माहिती व्हावी यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या किल्यांचे सर्वंधन पुरातत्व विभागाच्या माध्यामातून केले जाईल.

अन्य लेख

संबंधित लेख