पुणे – सध्या महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघणे आवश्यक आहे. आजचा समाज कर्तृत्वशाली महिलांनी घडवला आहे. महिलांना सबल करण्याची सुरूवात घरापासूनच केली पाहिजे, घरातील प्रत्येक छोट्या- मोठ्या निर्णयामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत सहाय्यक पोलिस आयुक्त (गुप्तवार्ता शाखा) उज्वला वैद्य यांनी व्यक्त केले.
शिवरूद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त “बालिकांचे कन्यापूजन व महिलांसाठी कुटुंबप्रबोधन” या विषयवार व्याख्यानात वैद्य बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये संवाद आणि चर्चा होणे गरजेचे आहे. पण संवाद आज लुप्त होताना दिसत आहे. टीव्ही, मोबाईल आणि इतर माध्यमामुळे घरातील संवाद संपुष्टात येत आहे, हे कुटुंबपद्धतीसाठी धोक्याचे लक्षण आहे.” उद्भवणाऱ्या समस्याविषयी मनमोकळेपणाने कोणाशी बोलावे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या वक्तव्यातील प्रमुख मुद्दे
- टीव्हीवर बघितली जाणारी मालिका, मोबाईलच्या गैरवापरामुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. याकडे डोळसपणे बघणे आवश्यक.
- महिलांनी विशेष करून तरुण मुलींनी समाज माध्यमांचा वापर योग्य प्रकारे करावा, त्याचा दुरूपयोग होऊ नये या करता काळजी घ्यावी.
- तरुण मुलींसाठी शाळा, महाविद्यालयीन मैत्रीकडे पालकांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मित्र असेल तर तो कितपत खरा आहे, त्याची नेमकी ओळख काय ! त्याच्या बद्दल प्राथमिक माहिती पालकांनी जाणून घ्यावी.
- आई ही मुलीची जीवभावाची मैत्रीण असायला हवी. आईने मैत्रिणीच्या रूपात मुलींशी संवाद साधावा.
असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उद्योगरत्न स्व.रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मानोहात व्यक्त केले. राजीव गांधी नगर, सुखसागरनगर व अप्पर भागातील महिलांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.