Thursday, November 14, 2024

राघोजी भांगरे – भारतमातेच्या चरणी अर्पण झालेले जीवनपुष्प

Share

भारतमाते, तुझ्या चरणावर अर्पित होणारी जीवनपुष्पे खरोखर धन्य होत! नगरांत फुललेली असंख्य फुले जशी तुझ्या चरणी अर्पित झाली तशीच रानावनात फुललेली असंख्य रानफुलेही! त्यातील अनेकांची इतिहासात नोंददेखील झाली नाही पण म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही.

1818 साली शनिवारवाड्यावर  युनियन जॅक फडकला आणि पुणे जिल्ह्यातील गडांवर राज्य करणाऱ्या महादेव कोळी समाजाच्या हक्कांवर गदा आली. कारण हे सगळे गडकरी पेशव्यांशी, मराठी साम्राज्याशी एकनिष्ठ होते. रामजी भांगरे आणि गोविंद खाडे या दोघा किल्लेदारांनी उठाव करून इंग्रजांचे वर्चस्व झुगारले. भिवंडी, मालेगाव येथून सैन्य आणून इंग्रजांनी त्यांचे युद्ध मोडून काढले. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवले, कधीही परत न येण्यासाठी!

याच रामजीचा मुलगा म्हणजे राघोजी वडिलांची कीर्ती ऐकतच मोठा झाला. जन्म 8 नोव्हेंबर 1805 , नगर जिल्ह्यातील देवगावचा. अंगात वडिलांचे बळ आणि देशभक्ती पुरेपूर उतरलेली, पण संधी मिळेपर्यंत शांत होता. 

कोकणात एक दरोडा पडला आणि इंग्रजांना रामजीच्या कुटुंबियांवर संशय आला. रामजीचे भाऊ, नातेवाईक, घरातल्या बायका अशा सगळ्यांना पकडून अतोनात छळ सुरू झाला.  हे कळल्यावर राघोजींची सहनशक्ती संपली आणि सुरवात झाली सह्याद्रीचे साम्राज्य हातात घेण्याची पराक्रमी गाथा.

गावोगावी फिरून राघोजींनी महादेव कोळ्यांची संघटना उभी केली, शस्त्रे जमा केली आणि विजयादशमीच्या दिवशी हिवाळ्या घाटाच्या खोल दरीत सर्वांचे एकत्रीकरण केले. प्रत्येकी 50 सैनिकांच्या 15 तुकड्या केल्या, प्रत्येक तुकडीला प्रमुख अधिकारी नेमले, महाड पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत भाग ठरवून जबाबदार्या दिल्या आणि स्वतःचे राज्य घोषित केले. 

इंग्रजांवर हल्ले, पोलिसांवर हल्ले, सावकारांचे खजिने लुटणे, फितुरांवर हल्ले असे धाडसी कार्य सुरू झाले. इंग्रजांना पुण्याला पळून जाणे भाग पाडले. 

राघोजी स्त्रियांबद्दल छ. शिवाजीचा आदर्श मानणारे होते. हरिश्चंद्र गडावरील शंकराचे, त्र्यंबकेश्वराचे, जेजुरीच्या खंडोबाचे आणि पंढरपूरच्या विठोबाचे भक्त होते. सामान्य जनतेवर प्रेम करणारे होते आणि म्हणूनच सर्वांचे त्यांच्यावर प्रेम होते. जव्हारच्या मुकणे राजांची, सुरगाण्याच्या पवार राजांची आणि साताऱ्याच्या छत्रपतींची त्यांना साथ होती.

राघोजींना पकडण्यासाठी इंग्रजांनी मोहीम काढली आणि सर्वत्र शोध सुरु झाला. सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यामुळे ते इंग्रजांना सापडत नव्हते. भवानी पेढेकर नावाचा त्यांचा मित्र एकदा इंग्रजांच्या तावडीत सापडला. त्याला घेऊन ते राघोजींची जागा शोधत होते. राघोजी सापडू नयेत यासाठी भवानीने त्यांना एका कड्यापर्यंत नेले आणि स्वतः कड्यावरून उडी टाकून प्राण दिले पण राघोजींचा पत्ता कळू दिला नाही.

इंग्रज कॅप्टन म्याकिंतोष याच्याशी त्यांनी आव्हान देऊन जुन्नर येथे युद्ध केले. इंग्रजांचे अतोनात नुकसान केले परंतु इंग्रजांनी अधिक व्यवस्थापन कौशल्य दाखवले. लढाईत दोन्ही बाजू दमल्या असताना बाजूला विश्रांती घेत असलेले ताज्या दमाचे सैन्य त्यांनी रणांगणात आणले आणि राघोजींना माघार घ्यावी लागली. 

नवे सैन्य उभारणे, शस्त्रे जमवणे सुरूच होते. परंतु इंग्रज वरचढ होत गेले. राघोजींच्या सैनिकांची घरे जाळणे, कुटुंबे नष्ट करणे, गावे उध्वस्त करणे असे प्रकार इंग्रजांनी सुरु केले.

राघोजींची इंग्रजांशी लढाई, पाठलाग, लपाछपी चालू असतानाच ते कधी हरिश्चंद्र गडावर महादेवाच्या दर्शनाला जात, कधी भीमाशंकरला जात, त्र्यंबकला आणि नाशिकला रामकुंडात स्नान करीत, जेजुरीला जात. अशी युद्धजन्य परिस्थिती असतानाच राघोजी वेष पालटून  पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला गेले. 

2 जानेवारी 1848 या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन ते पुन्हा वाळवंटात आले. साध्या वेशातील सैनिक त्यांच्या पाठीवरच होते. वाळवंटात त्यांनी निःशस्त्र राघोजींना पकडले. पुणे मार्गे ठाण्याला नेले आणि नावापुरता खटला चालवून ठाण्याच्या तुरुंगात 2 मे 1848 रोजी फाशी दिले. 

हा सह्याद्रीचा वाघ स्वातंत्र्यासाठी आणि देशासाठी फासावर चढला पण त्यांचे बलिदान वाया गेले नाही. सह्याद्री कधीही इंग्रजांच्या दबावाखाली शांत बसला नाही. जनतेने भारत स्वतंत्र होईपर्यंत विविध मार्गांनी लढाई चालूच ठेवली. महादेव कोळी समाज आजही देशभक्त, धर्मनिष्ठ आहे. ख्रिश्चनांनी आटोकाट प्रयत्न करूनही तो स्वतःचा हिंदूधर्म टिकवून आहे.

राघोजींच्या लढ्याचे महत्व हे आहे की हा लढा 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वी झाला.

जय #राघोजी !

हर हर महादेव ! 

भारत माता की जय !

– नरेंद्र पेंडसे 

अन्य लेख

संबंधित लेख