नागपूर : संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्याकडून शिकलो असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या (Jivhala Award Distribution Ceremony) निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक तथा व्याख्याते विवेक घळसासी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे आयोजित या समारंभास संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे, अविनाश संघवई, नागेश पाटील, श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी चळवळीत असताना मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. एक स्वयंसेवक म्हणून आपल्या परिने समाजाला योगदान द्यायचे हे मी निश्चित केलेले होते. स्वयंसेवकाला जे सांगितले ते त्याने करायचे असते असे विलासजी फडणवीस यांनी सांगून मला काही पर्याय ठेवला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात सहनशक्तीचा कस लागतो. समाजात जे काही चांगले दिसले त्यापासून मी शिकत आलो आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीकोनातून जे प्रकल्प हाती घेतले ते त्याच शिकवणुकीतून मी पूर्ण करत आलो. स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्यातील उपक्रमशीलतेचा गुण मी अंगिकारला असे सांगून त्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. कॅन्सर इन्स्टिट्यूटपासून इतर संस्था या समाजाला योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींप्रतिची एक कृतज्ञता असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाची संधी मला मधल्या काळात मिळाली होती. आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारात पदाला महत्त्व नाही हे मी माझ्या मनावर कायमचे बिंबविले आहे. कोणतेही पद हे आपल्या सुखासाठी नाही तर ज्यांच्यासाठी आपण पदावर आलो, त्या घटकांना सुखी करण्याचे पद हे माध्यम आहे अशी माझी मनापासून धारणा आहे. या धारणेमुळे मी तेव्हा मुख्यमंत्री पद स्वीकारले नाही. बाहेर राहूनच आपण चांगले काम करु, असा माझा त्यावेळी समज होता. परंतु सत्ताबाह्य राहून लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या केंद्रातून कामे करण्यापेक्षा सत्तेत उपमुख्यमंत्री राहून लोकशाहीच्या मूल्यात्मक आदरापोटी ती जबाबदारी स्वीकारली असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आपण आणली पाहिजे. सर्वसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अधिक सकारात्मक, आश्वासक झाला पाहिजे यादृष्टीने मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर अगोदर हे जाहीर केले आहे . कोणत्याही खोट्या आरोपातून केलेल्या नकारात्मक वातावरणाला आता समाज मान्यता देत नाही हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. एका दृष्टीने कलूषित झालेल्या राजकारणाला लोकांनीच शुद्ध करण्याकरिता घेतलेला हा पुढाकार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात कोणीही कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.
माझ्या कुटुंबाने सहनशक्ती धैर्याने पेलून दाखविली आहे. माझी मुलगी ही प्रचंड समंजस असून तिच्या उत्तराने मीही स्तब्ध होतो. राजकारणापलीकडे जाऊन ती साऱ्या बाबी पाहते याचे मला प्रचंड समाधान आहे. आमच्या संसारात आम्ही दोघांनी एक तत्व पाळले आहे. ज्याला जे आवडते ते केले पाहिजे. हे विचारस्वातंत्र्य आम्ही सन्मानाने जपतो, असे त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
- जिव्हाळा पुरस्कार वितरण
स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. अकोला येथील गायत्री बालिका आश्रम व नागपूरच्या संवेदना परिवाराला प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.