Wednesday, April 2, 2025

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान

Share

‘सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण समारंभ’ दरवर्षी महाराष्ट्र बँकेतील निवृत्त कमर्चारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून आयोजित केला जातो. कार्यक्रमाच्या नावातूनच कोणत्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे, हे सहजच लक्षात येते. एका वेगळ्या सामाजिक उपक्रमाची ही ओळख.

बँक अॉफ महाराष्ट्र मधून निवृत्त झालेल्या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय गेल्या पंचवीस वर्षात शेकडो सामाजिक संस्थांना आला आहे. बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बोमरेवो (Bank of Maharashtra Retired employees’ welfare organization) ही संघटना गेली २५ वर्षे सभासदांसाठी चांगले काम करत आहे. निवृत्तांची एक संघटना असावी या हेतूने १८ एप्रिल १९९९ रोजी स्थापन झालेल्या या संघटनेने सभासदांचे प्रश्न, अडचणी सोडवण्याबरोबरच सामाजिक भानही ठेवले आहे.

ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो, मोठे झालो, आर्थिक दृष्ट्या सुस्थिर झालो, त्या समाजाप्रती आपण काही देणे लागतो आणि हे देणे आपण थोड्या फार प्रमाणात देऊ शकलो, तर त्याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून देतो. समाजातील वंचित, उपेक्षित, शोषित, पीडित घटकांसाठी आपण काही करू शकलो याचे मानसिक समाधानही मिळते. फक्त सभासदांचे आर्थिक प्रश्न सोडवणे एवढेच उद्दिष्ट समोर न ठेवता संघटनेचे संस्थापक आणि भारतीय मजदूर संघाचे (Bharatiya Mazdoor Sangh) ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. बाळासाहेब फडणवीस यांनी सभासदांसमोर सामाजिक कृतज्ञता हा विषय ठेवला. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना, व्यक्तींना संघटना म्हणून आपण काही आर्थिक स्वरूपाचा निधी देऊ, अशी ती कल्पना होती. या कल्पनेतून निधी समर्पण समारंभाला सुरुवात झाली, अशी माहिती संघटनेचे उप सरचिटणीस दिलीप निमकर यांनी दिली. मोहन घोळवे संघटनेचे अध्यक्ष, भास्कर माणकेश्वर कार्यकारी अध्यक्ष, तर नारायण अचलेरकर महासचिव आहेत.

सभासदांचे योगदान
सर्वप्रथम २००५ साली धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी येथे असलेल्या भटके, विमुक्त मुलांच्या शाळेसाठी पंचवीस हजारांचे योगदान करून या निधीची सुरुवात झाली. योगदान हा विशिष्ट शब्द उपयोगात आणण्याचे देखील एक कारण आहे. वर्गणी या शब्दात एक देणे दिल्याची भावना निर्माण होते, म्हणून आम्ही सभासद या कार्यात आमचे योगदान देत असतो, अशी आमची भावना असते, असेही निमकर म्हणाले. यमगरवाडी पासून सुरू झालेल्या या समर्पण भावनेचा आज २५ वर्षांनंतर एक वटवृक्ष झाला आहे. आज मितीला संघटनेच्या सभासदांनी केलेल्या योगदानाचे मूल्य साधारण तीन कोटीपर्यंत गेले आहे. हा निधी आम्ही संस्थांना देत नाही तर अर्पण करतो, ज्यात सभासदांची समर्पणाची भावना असते. दर वर्षी साधारण ७० ते ७५ संस्थांना हा निधी समर्पित केला जातो. या संस्था समाजात उपेक्षितांसाठी, दिव्यांगांसाठी तसेच समाजसेवेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असतात, असे निमकर यांनी सांगितले.

यंदाचा हा निधी समर्पणाचा कार्यक्रम बुधवारी, २६ मार्च रोजी नवी पेठेतील निवारा सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीश गोगुलवार उपस्थित राहणार आहेत. छात्र युवा संघर्ष वाहिनी या कै. जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या तरुणांच्या चळवळीतून आलेले डॉ. गोगुलवार सध्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे एक प्रमुख आधारस्तंभ आहेत. संस्थेच्या माध्यमातून महिला, शेतकरी, वनवासी यांच्या आरोग्यासाठी डॉ. गोगुलवार गेली ३५ वर्षे समाजाच्या आरोग्यासाठी काम करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख