Thursday, August 14, 2025

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Share

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत, प्राधिकरणाच्या रचना व संकल्पनेचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विस्तृत सादरीकरण केले. नदी पुनरुज्जीवनासाठी ‘डीपीआर’ व खोरे व्यवस्थापन योजना मंजूर करणे, अतिक्रमण, वीज, भूसंपादन यासंबंधी अडचणी सोडवणे, राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्ये प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री असतील, तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. याव्यतिरिक्त, पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत असेल, ज्यात तांत्रिक तज्ञ, कायदेतज्ञ आणि आयआयटीसारख्या संस्थांमधील तज्ञांचा समावेश असेल. दैनंदिन कामकाजासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र सचिवालयही स्थापन केले जाईल.

या निर्णयामुळे राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख