भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण सामाजिक, राजकीय आणि नैतिक आचरणाचा एक दीपस्तंभ आहे. त्याचं महत्त्व केवळ एका ‘प्राचीन ग्रंथा’पुरते मर्यादित नाही; आज ते एक जिवंत राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून आपल्यासमोर उभे आहे. जे भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाच्या वाटचालीत आजही दिशादर्शन करतं.
लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि नैतिकता यांना आजच्या आधुनिक युगात नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, तिथे रामायणासारख्या प्राचीन ग्रंथातल्या मूल्यव्यवस्थेकडे पुन्हा एकदा पाहणं अनिवार्य होतं. भ्रष्टाचार, विषमता आणि नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाने ग्रासलेल्या समाजाला रामायणातले आदर्श उत्तरं देऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर शोधल्यास लक्षात येते की, हा ग्रंथ आधुनिक भारतासाठी एक प्रेरक आणि मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे.
शासनाचा आत्मा: राजधर्म आणि लोकहित
रामायणकालीन शासनप्रणाली ही राजेशाही असली तरी ती अमर्याद नव्हती. राजाच्या अधिकारांवर ‘धर्म’ आणि ‘लोकहित’ यांचा नैतिक अंकुश होता. “जो प्रजेच्या सुखाने सुखी आणि त्यांच्या दुःखाने दुःखी होईल, तोच आदर्श राजा” ही संकल्पना शासकाला प्रजेचा स्वामी नव्हे, तर सेवक मानते. प्रभू श्रीरामांचं ‘रामराज्य’ हे याच प्रजा-केंद्रित शासनाचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्या राज्यात सामान्य नागरिकाचा आवाज थेट राजापर्यंत पोहोचत असे. आधुनिक लोकशाहीचं ‘लोकांचे, लोकांसाठी, लोकांचे राज्य’ हे तत्त्व आणि रामराज्याची ही संकल्पना यात एक विलक्षण साधर्म्य आहे.
राजाचा कारभार केवळ त्याच्या इच्छेवर अवलंबून नव्हता. ज्ञानी आणि अनुभवी मंत्र्यांचा सल्ला, एक सु-विकसित प्रशासकीय रचना आणि न्यायपूर्ण करप्रणाली ही आदर्श राज्याची लक्षणं मानली जात. चित्रकूट भेटीच्या वेळी श्रीरामांनी भरताला शासकाने टाळावयाच्या १४ दोषांची जी यादी सांगितली आहे. ती आजही कोणत्याही प्रशासकीय किंवा कॉर्पोरेट नेतृत्वासाठी एक कालातीत ‘चेकलिस्ट’ आहे. न्यायदानाचं महत्त्व तर इतकं होतं की, प्रजेला त्रास देणाऱ्या आपल्याच पुत्राला (असमंज) राजा सगराने हद्दपार केलं. न्याय हा वैयक्तिक नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, या भारतीय धारणेचं मूळ इथेच सापडतं.
आदर्श समाजाची वीण: धर्म, त्याग आणि सेवा
रामायणाने एका आदर्श शासकाबरोबरच एका आदर्श समाजाचीही कल्पना मांडली. इथे ‘धर्म’ म्हणजे केवळ पूजा-अर्चा नाही. धर्म म्हणजे ‘कर्तव्य’ आणि ‘सदाचार’. पित्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी राजसिंहासनाचा त्याग करून चौदा वर्षांचा वनवास स्वीकारणारे श्रीराम, हे कर्तव्यपालनाचं सर्वोच्च उदाहरण आहेत. पतीधर्मासाठी राजसुखाचा त्याग करणारी माता सीता आणि सत्तेचा मोह सोडून राज्यकारभार पुढच्या पिढीकडे सोपवणारे राजा दशरथ, हे आदर्श आजही कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांसाठी मार्गदर्शक आहेत.
श्रीरामांनी आपल्या वनवासाच्या काळात समाजातल्या सर्वात उपेक्षित घटकांनाही प्रेमाने जवळ केलं. शबरीची उष्टी बोरे खाणं, केवट आणि निषादराजाला आलिंगन देणं यातून त्यांची सामाजिक समरसतेची भावना दिसून येते. भौतिक सुखाला अतोनात महत्त्व मिळालेल्या आजच्या जगात ‘त्याग’ माणसाला केवळ श्रेष्ठच नाही, लोकप्रिय करतो; ही शिकवण अत्यंत मोलाची आहे.
‘रामराज्य’ ते ‘राष्ट्रधर्म’: मूल्यांचा आधुनिक अविष्कार
‘रामराज्य’ एका आदर्श, कल्याणकारी आणि न्यायाच्या राज्याचं द्योतक आहे. जिथे शारीरिक, दैवी किंवा भौतिक दुःखाला स्थान नाही, असे राज्य म्हणजे रामराज्य.
या मूल्यांची प्रासंगिकता केवळ सामाजिक जीवनापुरती मर्यादित नाही. भारतीय संविधान आणि रामायणातल्या मूल्यांमध्ये एक अद्भुत साधर्म्य आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतली न्याय, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री रामायणातल्या ‘सर्वभूत-हित’ (सर्वांचे कल्याण) या संकल्पनेशी थेट जुळते. संविधानाने आपल्याला शासनाचे ‘नियम’ दिले. रामायणाने त्या नियमांमागील ‘मूल्य’ आणि ‘भावना’ उलगडून दाखवल्या. अशा अर्थाने रामायण हे संवैधानिक लोकशाही चालवण्यासाठी आवश्यक असलेलं नैतिक ‘सॉफ्टवेअर’ आहे.
ही तत्त्वं भारताच्या सामरिक विचारांना आणि परराष्ट्र धोरणालाही दिशा देतात. शांतता आणि सौहार्दाचा आग्रह धरतानाच, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलायला मागेपुढे न पाहणारे श्रीराम, हे आधुनिक भारताच्या संरक्षण धोरणाचे प्रतिबिंब आहे. रामचरितमानसातली, “भय बिनु होइ न प्रीति” ही चौपाई भारताच्या आधुनिक सामरिक विचारांचं अचूक वर्णन करते. शांतता आणि संवाद हे पहिलं प्राधान्य असलं, तरी जेव्हा विनंतीला आगतिकता समजलं जातं, तेव्हा राष्ट्राला आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून सुरक्षा प्रस्थापित करावी लागते. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेली कारवाई, हे याच रामनीतीचं आधुनिक रूप होतं. यातून भारताने स्पष्ट संदेश दिला की, संवाद अयशस्वी झाल्यावर राष्ट्राच्या संरक्षणासाठी ‘दंड’ नीतीचा वापर आवश्यक ठरतो. अशा प्रकारे रामायणातील ‘राजधर्म’ आजही भारताच्या ‘राष्ट्रधर्मा’चा अविभाज्य भाग आहे.
निष्कर्ष: एक जिवंत तत्त्वज्ञान
रामायण हे केवळ एका गौरवशाली भूतकाळाचे प्रतीक नाही. ते उज्ज्वल भविष्यासाठी एक चिरंतन प्रेरणास्रोत आहे. प्रशासनातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी ‘राजधर्मा’चा निःस्वार्थ आदर्श, समाजातील विषमता दूर करण्यासाठी श्रीरामांची सर्वसमावेशकता आणि राजकीय अधःपतन रोखण्यासाठी नैतिक नेतृत्वाचा आदर्श आजही तितकाच प्रासंगिक आहे.
रामायण आपल्याला शिकवतं की, खरी शक्ती संपत्ती किंवा सैन्यात नाही. ती नैतिक चारित्र्यात आणि सचोटीमध्ये आहे. जेव्हा शासक स्वतःला प्रजेचा सेवक समजेल, तेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचेल आणि जेव्हा प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. ही जबाबदारी केवळ शासकांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. एका उज्ज्वल, न्यायपूर्ण आणि नैतिक भविष्याकडे मार्गक्रमण करण्याची चिरंतन प्रेरणा घेता यावी, म्हणून रामायण आहे.