पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या कोर्टाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली. पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. पुरोहित यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी काश्मीरमधून आरडीएक्स मागवलं होतं आणि त्यांच्याच घरी बॉम्ब तयार करण्यात आला असा आरोप त्यांच्यावर होता. याबाबतचे कुठलेही पुरावे नसल्याने कोर्टाने नमूद केले आहे. पुरोहित यांनी नऊ वर्षे तुरुंगात घालवली. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, त्यांना राजकीय कट रचून अडकवण्यात आले आहे.
पुरोहित यांना सुमारे १७ वर्षांच्या कायदेशीर लढाई, छळ आणि अपमानानंतर, ही पदोन्नती मिळाली आहे. प्रसाद पुरोहित यांच्या पदोन्नतीच्या वृत्ताला लष्कराने दुजोरा दिला असून, पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीनंतर आता पुरोहित यांचा कर्तव्यावर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.