भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे.
समाजातील सज्जन शक्तीला सोबत घेऊन भटके विमुक्तांचे सर्वेक्षण आणि त्यांना मूलभूत कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या. समाजाला बरोबर घेऊन हे काम केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय घुमंतू कार्य प्रमुख दुर्गादासजी यांनी व्यक्त केला.
भटके विमुक्तांना त्यांची मूलभूत कागदपत्रे मिळावीत यासाठी उपयुक्त ठरेल असे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा उद्घाटन समारंभ नुकताच पुण्यात झाला. या कार्यक्रमात दुर्गादासजी बोलत होते. भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे हे ॲप तयार करण्यात आले आहे.
पुण्यातील ‘मिडिया विद्या’ या माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुलजी लिमये आणि भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उद्धवराव काळे यांची कार्यक्रमात उपस्थिती होती. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सेवाकार्य प्रमुख शैलेंद्र बोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजन करण्यात आले. त्यानंतर अतुलजी लिमये यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीने सहभागी होऊन ॲपचे उदघाटन केले.
महाराष्ट्र भटके विमुक्तांसाठीच्या कार्यात अग्रेसर आहे. कालानुरूप संसाधनांच्या वापरचा एक भाग म्हणजे मूलभूत कागदपत्र सर्वेक्षणासाठी तयार केलेले मोबाईल ॲप होय. असा प्रयत्न आगामी काळात सर्वच आयामांसाठी आणि देशभरात सर्वांनी एकत्र येऊन करावा, अशी अपेक्षा दुर्गादासजी यांनी कार्यक्रमात व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्य अधिक व्यापक आणि १०० टक्के भटके विमुक्त समाजापर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य आहे. संघ विचारांच्या शताब्दी पर्वाच्या अनुकूलतेच्या काळात भटके-विमुक्त समाजासाठी सज्जन शक्ती आणि समाजातील संस्था, संघटनांना सोबत घेऊन नेमक्या समस्यांवर उपाय केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल. समाजाचा व्यवहार बदलायचा आहे. त्याबरोबरच भटके-विमुक्तांच्या सर्वंकष विकासाच्या माध्यमातून सर्व बाबतीत सर्वांच्या बरोबरीत भटके-विमुक्त समाजाला आपण आणू, असेही दुर्गादासजी यांनी सांगितले.
‘मूलभूत कागदपत्रांसाठी परिषदेचे काम’
‘बंधुभाव हाच धर्म’ या संघटनेच्या ध्येयानुसार शिक्षण, स्वावलंबन, सन्मान आणि सुरक्षा या चतुःसूत्रीवर परिषदेचे कार्य चालते, असे सांगून उद्धवराव काळे यांनी यमगरवाडी प्रकल्प, पालावरची शाळा, आरोग्य पेटी, आरोग्य शिबिरे, बचतगट, स्वावलंबन यांच्या माध्यमातून चालणाऱ्या कार्याची माहिती दिली.
भटके विमुक्त समाजापर्यंत सरकारी योजना पोहोचत नाही किंवा योजनांचे लाभ त्यांना मिळत नाहीत याला कारण त्यांच्याकडे असलेला मूलभूत कागदपत्राचा अभाव हे आहे. त्याच्या पूर्ततेसाठी जानेवारी २०२४ पासून परिषदेने ३० जिल्हयातील १४० तालुक्यात ५८७ वस्त्यांवर ६५,६७६ व्यक्तींचे सर्वेक्षण केले. त्यातून महाराष्ट्र शासनाने परिषदेच्या सहयोगातून १८ जिल्हयातील ८१ तालुक्यात २४० वस्त्यांवर विशेष शिबिरे आयोजित केली. या शिबिरांमधून ४२,०७३ इतक्या संख्येत कागदपत्रे मिळाली. यापुढे हे कार्य अधिक गतीने करण्यासाठी हितरक्षा कार्य आणि मोबाईल ॲपची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वेक्षणासाठी वापर
ॲपची तांत्रिक माहिती आणि वैशिष्ट्ये तसेच त्याचा वापर याबाबत ॲप तयार करणाऱ्या समूहाचे प्रमुख आणि परिषदेचे प्रदेश प्रचार-प्रसार व सोशल मिडिया प्रमुख अविनाश शेंडगे यांनी माहिती दिली. या ॲपमुळे वस्तीचे आणि व्यक्तींचे सर्वेक्षण करता येईल. वस्तीची माहिती आणि समस्या तसेच उपक्रम सर्वेक्षण, व्यक्ती सर्वेक्षण, कोणती कागदपत्रे आहेत/नाहीत, रोजगार, शिक्षण, आयोजिलेली शिबिरे, त्यात भरलेले फॉर्म, दिलेली प्रमाणपत्रे ही माहिती साठवता येईल. तसेच वेगवेगळ्या स्वरूपात अहवाल तयार करता येतील आणि त्यांचे विश्लेषण करता येईल. यापुढे याच ॲपद्वारे सर्वेक्षण केले जाईल, असे शेंडगे यांनी सांगितले.
कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संघाच्या पश्चिम क्षेत्राचे कार्यवाह बाळासाहेब चौधरी, क्षेत्र प्रचारक सुमंतजी आमशेकर, परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, प्रदेश कार्यवाह नरसिंग झरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेच्या महिला व अध्ययन कार्य प्रमुख शुभांगी तांबट यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात परिषदेचे राज्य प्रमुख राहुल चौहान, ‘मिडीया विदया’चे अजिंक्य कुलकर्णी, परिषदेचे प. महाराष्ट्र प्रांत संयोजक स्वामी धनगर, हितरक्षा प्रमुख डॉ. जितेंद्र ठाकूर, पुणे महानगर संयोजक अरविंद देवकर यांचा महत्त्वपूर्ण सहयोग राहिला.