महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भगवान बिरसा कलासंगम‘ राज्यस्तरीय कार्यक्रम कोकण विभागात उत्साहात संपन्न झाला. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
महाराष्ट्रातील ४७ जनजातींच्या महान संस्कृती आणि श्रेष्ठ कला परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन व्हावे, या उद्देशाने ‘भगवान बिरसा कला मंच’ कार्यरत आहे. आदिवासी समाज हजारो वर्षांपासून आपली कला, परंपरा (नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला, हस्तकला) सण, लग्नकार्य आणि देवीचं जागरण यांसारख्या माध्यमातून जतन करत आला आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हा कलासंगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जुलै २०२५ मध्ये स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्रातील १०,००० पेक्षा जास्त आदिवासी कलाकारांनी विविध श्रेणींमध्ये ऑनलाइन नोंदणी करून कलेचा कंटेंट अपलोड केला आहे. दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा महाराष्ट्रातील पाच विभागात होत आहे. यामध्ये कोकण विभागाची स्पर्धा नुकतीच पार पडली. एकूण ४०० हून अधिक कलाकारांनी या स्पर्धेत नृत्य, गायन, वाद्य वादन, हस्तकला आणि चित्रकला या पारंपारिक प्रकारांच्या माध्यमातून आपली कला सादर केली. स्पर्धेची सुरुवात ‘हिरवा देव’, ‘धरतरी माता’ आणि ‘भगवान बिरसा मुंडा’ यांच्या पूजनाने झाली.
पुढील टप्पा ‘जनजाती गौरव दिन‘
कोकण विभागातून निवड झालेले हे कलाकार स्पर्धक नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या भगवान बिरसा मुंडा जयंती तथा ‘जनजाती गौरव दिना’ च्या मुख्य शासकीय कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत. या स्पर्धेमुळे आदिवासी संस्कृती आणि कला परंपरांचे दर्शन संपूर्ण देशाला होत आहे.

या कार्यक्रमाला प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गावदेव, जनजाती विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष नरेश मराड, ज्येष्ठ कलाकार हरेश्वर वनगा तसेच मुंबई विद्यापीठाचे कला विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. भगवान बिरसा कला मंच भविष्यातही आदिवासी कलेची सेवा करत राहण्याचा मानस व्यक्त केला आहे.