मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. हा बोगदा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.
प्रवासातील अडथळे होणार दूर
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इस्टर्न फ्रीवे’वरून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी नागरिकांना मोठा फेरा मारावा लागत होता आणि मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांच्याही प्रवासात मोठी अडचण येत होती. “या पार्श्वभूमीवर ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह बोगद्याचा निर्णय हा मुंबईच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
🔸प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
✅एकूण लांबी : 9.96 किमी (Twinned Tunnel)
✅मार्गिकांची लांबी : 3–3.5 किमी
✅700 मालमत्तांखालून टनेल, ज्यात 100 वर्षांहून जुन्या वारसा इमारतींचा समावेश
✅पश्चिम व मध्य रेल्वे मार्गाखालून आणि मेट्रो लाईन-3 च्या 50 मीटर खालून बोगद्याचा मार्ग
✅स्मार्ट ITS Mobility तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुविधा
✅सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका
🔸अपेक्षित लाभ
✅दररोज हजारो नागरिकांचे हजारो तास वाचणार
✅इस्टर्न फ्रीवे आणि किनारी रस्ता यांच्यात जलद कनेक्टिव्हिटी
✅दक्षिण मुंबई आणि विमानतळाकडे प्रवास अधिक सुलभ
✅वाहतूक कोंडीतील मोठ्या प्रमाणातील घट
प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प
या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, निश्चित वेळेपेक्षा ६ महिने आधी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) चे अभिनंदन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते.