Thursday, October 30, 2025

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

Share

“ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असणे आवश्यकच आहे.स्वराज्याच्या रक्षणासाठी सुसज्ज, बळकट आरमार उभारण्याची गरज शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यामुळे स्वराज्याचे आरमार हा आजच्या आधुनिक भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे.

आरमार उभे करण्यासाठी योग्य जागा समुद्रापासून आत असणे आवश्यक होते कारण पोर्तुगीज सहजासहजी मराठ्यांचे आरमार उभे करू देणार नाहीत म्हणून शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील कल्याण, भिवंडी, ठाणे व पनवेल असा सुभा १९५७ साली जिंकून घेतला. जहाजासाठी लागणाऱ्या सागाचे वृक्ष देखील या भागात मुबलक प्रमाणात होते.

वसुबारस (गोवत्सद्वादशी) अर्थात अश्विन कृष्ण द्वादशी, शालिवाहन शक १५७९, हेमलंबी संवत्सर (इंग्रजी दिनांक २४ ऑक्टोबर १६५७) या शुभमुहूर्तावर शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीच्या मुखावर दुर्गाडी किल्ला व जहाज बांधणी कारखाना उभारणीस सुरुवात करून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. सिंधूबंदीच्या धार्मिक कायद्याला छेद देत, दर्यावर राज्य करण्याच्या दृष्टीने हे एक दमदार पाऊल होते‌. म्हणूनच वसुबारस हा दिवस “आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.

वस्तुतः भारतीय उपखंडात नौकानयन सुमारे अडीच हजार वर्षापासून अस्तित्वात होते. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, शिलाहार ते देवगिरीचे यादव इथपर्यंत वेगवेगळ्या राजांच्या आरमारांचा उल्लेख ठिकठिकाणी आढळतात. पण सहाव्या शतकापासून मुस्लिम आक्रमकांनी भारत गिळंकृत करायला सुरुवात केली आणि चौदाव्या शतकापर्यंत भारतीय आरमाराचाही नायनाट झाला. आपल्यापासून लपवली गेली वा विशेष करून सांगितली गेली नाही अशी एक विशेष बाब अशी की ६व्या शतकातील चालुक्य सम्राट सत्याश्रय पुलकेशी स्वतःला पश्चिम समुद्राचा स्वामी असं म्हणवून घेत होता आणि त्याचे भूदल आणि नौदल म्हणजे आरमार दोन्ही प्रचंड बलवान होते.

सन ६३७ मध्ये इस्लामची पहिली लाट भारतावर समुद्रमार्गे चालून आली होती ती महाराष्ट्राच्या कोकण भागातच. श्री स्थानक म्हणजे ठाणे या समृद्ध शहरावर अरबांच्या आरमाराने हल्ला चढवला. परंतु पुलकेशीच्या बलाढ्य आरमाराने, त्यांना ठाण्याच्या समुद्रात साफ बुडवून टाकले. इस्लामी आक्रमक आणि हिंदू यांच्यातील पहिल्या लढाईचा इतिहास बहुधा तिच्यात हिंदू विजयी झाले म्हणून लपवला गेला. परंतु १४व्या शतकापर्यंत तुर्क-अफगाण सुलतानांनी यादवांसकट संपूर्ण दक्षिण भारत जिंकला आणि हिंदू आरमाराची परंपरा नष्ट होण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम समुद्रावरचे नौकानयन पूर्णपणे अरबांच्या हातात गेले.

अशा प्रतिकूल परिस्थितीत मागील ४०० वर्षात आपल्याकडे जहाज बांधणी झालेलीच नव्हती. महाराजांच्या दूरदृष्टीने पोर्तुगीज, इंग्रज अशा फिरंग्यांचा धोका ओळखला होता . जुलमी सिद्धीचा बंदोबस्त करायचा, तर त्याची रसद तोडण्यासाठी बळकट आरमाराची गरज आहे हे लक्षात घेऊन महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली. वसुबारसेच्या शुभमुहूर्तावर जहाज बांधणी करता दुर्गाडी किल्ल्याची (डॉकयार्ड म्हणून) उभारणी केली.अशाप्रकारे शिवरायांनी पश्चिम समुद्रावर आरमारी वर्चस्व प्रस्थापित करून प्राचीन हिंदू नौकानयन परंपरांचे पुनरुज्जीवन करून दाखवले. आणि स्वराज्याच्या आरमाराचा दर्यावर दरारा निर्माण केला, तो सुद्धा सन १६५७ ते १६८० अशा अवघ्या २३ वर्षांत.

-हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख