Friday, January 16, 2026

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष

Share

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला.

विखे-जगताप जोडीने मारली बाजी
अहिल्यानगरच्या राजकारणात विखे पाटील आणि जगताप हे दोन मोठे गट एकत्र आल्याने महायुतीची ताकद प्रचंड वाढली होती. डॉ. सुजय विखे आणि संग्राम जगताप या तरुण नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत शहरात विकासकामांचा अजेंडा राबवला. या ‘पॉवरफुल’ जोडीसमोर विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले असून महापालिकेत आता महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये भाजपची ‘हॅट्ट्रिक’
विजयाचा आनंद साजरा करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्याने आज विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. विधानसभा, नगरपालिका आणि आता महानगरपालिकेतही जनतेने महायुतीला कौल दिला आहे. भाजप हाच राज्यातील ‘नंबर १’ चा पक्ष आहे, हे मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.”

“दोन भाऊ एकत्र आल्याने निवडणूक जिंकता येत नाही”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संदर्भाने सूचक वक्तव्य करताना विखे पाटील पुढे म्हणाले, “केवळ दोन भाऊ एकत्र आले म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कामावर शिक्कामोर्तब केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच अव्वल स्थानी राहील.”

या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेला बसला आहे. खासदार नीलेश लंके यांना लोकसभेला मिळालेली साथ महानगरपालिकेत राखण्यात लंके यांना अपयश आल्याचे दिसते. एकेकाळी नगर शहरात ताकद असलेल्या शरद पवार गटाला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

अन्य लेख

संबंधित लेख