Wednesday, February 11, 2026

“कोणाच्याही मनात शंका राहू नये”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून १०० टक्के ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गंभीर आरोपाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कोणाच्याही मनात शंका असेल तर त्याचे निरसन झालेच पाहिजे,” असे म्हणत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे.

रोहित पवारांचा नेमका आरोप काय?
काल (१० फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “माझे कोणतेही तांत्रिक बॅकग्राउंड नसले तरी, एक सामान्य व्यक्ती म्हणून मला हा अपघात वाटत नाही. हा १०० टक्के घातपात असू शकतो. माझी आणि महाराष्ट्रातील जनतेची हीच शंका आहे की, हा घात होता का? तपास यंत्रणांनी सत्य समोर आणावे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मुंबई महानगरपालिकेत महापौर निवडीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “या घटनेची चौकशी आधीच सुरू करण्यात आली आहे. ‘डीजी सेफ्टी’ (Directorate General of Civil Aviation Safety) मार्फत महत्त्वाची तपासणी केली जात आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील. कोणाच्याही मनात शंका राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

“या अपघाताची पूर्ण चौकशी व्हावी, यासाठी मी स्वतः केंद्र सरकारला पहिले पत्र लिहिले होते. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आणि हवाई सुरक्षा अधिक सुदृढ करण्यासाठी हा तपास महत्त्वाचा आहे.”

अन्य लेख

संबंधित लेख