अजित पवार : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe Patil) प्रचाराला आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर सडकून टीका केली.
“चुकीची माणसं दिले तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं. नको त्या माणसाला निवडून दिलं. गेल्या आमदारकीला माझीसुद्धा चूक झाली. त्यावेळी तुमच्यातलेच अनेक जण माझ्याकडे आले होते. दादा निलेश ला द्या. दादा निलेशला द्या म्हणत होते. तुमच्या प्रेमाखातीर आणि आग्रहाखातीर उमेदवारी दिली. मात्र वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. प्रचंड मतांनी निवडून आणलं. गडी दिसायला बारीक दिसतो. मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. मी त्याला विकास कमाला निधी द्यायचे. कसं साधं घर आहे, कसे आई-वडील हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक-एक लक्षणं कळायला लागली”, असा दावा अजित पवार यांनी केला.
“अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो. आणि हा पट्ट्या ए कलेक्टर.. पोलिसांनाही मी तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो. अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्यामागे लागलो तर आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे, कंड जिरवतो. तुझा असा कंड जिरवेल की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल”, असा इशारा अजित पवारांनी निलेश लंके यांना दिला.
“माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती? मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. जर तू आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला ना तर, बघून घेईल तुला काय करायचे. मी अजिबात हे असल सहन करणार नाही. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचा सल्ला सुद्धा दिला. आचारसंहिता संपल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेईन. आता तर तो आमदारही नाहीये. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झालाय. त्यामुळे त्याची अरेरावी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नका. मात्र कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका”, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आहे. असं अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.