Thursday, October 10, 2024

अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होणार?

Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने वातावरणनिर्मितीसाठी भाजपचे दिग्गज नेत्यांचे दौरे वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मंगळवारपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी महायुतीतील जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपच्या आढावा बैठकीसाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपराजधानी नागपुरात (Nagpur) येत आहेत. शहा हे मंगळवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर रात्री उशिरा संभाजीनगरमध्ये पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमध्ये अमित शहा हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. चारही ठिकाणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील नेते, बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. चारही ठिकाणी सुमारे दोन हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीतील जागावाटपाच्या संदर्भात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वासाची भावना निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अन्य लेख

संबंधित लेख