Tuesday, February 24, 2026

“वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. “आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय आहे ७५० चौरस फुटांच्या करमाफीचा वाद?
आशिष शेलार यांनी पुराव्यासह उबाठा सेनेची ‘लबाडी’ उघड केली आहे. शेलार यांच्या मते:

भाजपची आग्रही मागणी: ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ५०० चौरस फुटांच्या घरांना कर माफीचा प्रस्ताव आला, तेव्हा भाजप नगरसेवकांनी ही मर्यादा ७०० चौरस फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.

सत्ताधाऱ्यांचा अडथळा: तत्कालीन पालिका आयुक्तांनी याला सहमती दर्शवूनही, पालिकेतील सत्ताधारी उबाठा सेनेने मात्र केवळ ५०० फुटांचाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून मुंबईकरांची फसवणूक केली.

मुंबईकरांसोबत उबाठा सेनेने केलेली लबाडी आमच्या लक्षात आल्यानंतर तातडीने विधानसभेत आशिष शेलार यांनी स्वतः हा मुद्दा मांडला आणि ७०० ते ७५० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करणारा प्रस्ताव पालिकेकडून घ्यावा, अशी मागणी दि. ७ मार्च २०१८ ला तत्कालीन सरकारकडे केली.

यांनी ७०० ते ७५० चौरस फुटाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे न पाठवून विरोधच केला होता.

आता “नवनवीन” आलेले ठाकरे नवनवीन काही तरी करतोय असा आर्विभाव आणून मुंबईकरांना जो नवनवीन “शब्द” देत आहेत… यावर शेलार कडाडले की, “मुंबईकरांना जे नवनवीन शब्द दिले जात आहेत, ते प्रत्यक्षात भाजपच्याच जुन्या मागण्या आहेत. मुंबईकरांसोबत केलेली लबाडी जनता विसरलेली नाही.”

मुंबईकरांना कोणावर विश्वास?
मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरल्यामुळे आता निवडणुकीत ‘मराठी आणि मध्यमवर्गीय’ मुंबईकर कोणाच्या बाजूने उभा राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शेलार यांच्या या खुलाशामुळे कर माफीच्या श्रेयवादाची लढाई आता अधिक तीव्र झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख