मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या विजयाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून अत्यंत बोचरी टीका केली आहे. “मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
“मराठी माणसा जागा हो” अशी हाक दिल्यानंतर मराठी समाजाने अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याचे सांगत शेलार यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. दऱ्या-खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला असून, स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जनतेने ठेचून काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही पक्षांची चिन्हे आणि त्यांचा अहंकार मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे त्यांनी सूचित केले.
मशालीचा ‘कोन’ आणि इंजिनाचे ‘निशाण’
आशिष शेलार यांनी आपल्या कवितेत उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाल’ आणि राज ठाकरे यांच्या ‘इंजिन’ या चिन्हांचा उल्लेख करत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणतात, “स्वार्थी ‘मशाली’ला मराठी माणसाने आईस्क्रीमच्या कोनासारखे फेकून दिले आहे.” “‘इंजिना’चे तर निशाणच मिटले असून तुमच्या अहंकाराला जनतेने चक्काचूर केले आहे.”
‘औरंगजेब फॅन क्लब’ आणि ‘जातीपातीचे विष’
केवळ चिन्हांवरच नव्हे, तर शेलार यांनी उबाठा गटाच्या राजकीय भूमिकेवरही गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेससोबतच्या आघाडीला त्यांनी ‘अफवा गँग’ म्हटले असून, उद्धव ठाकरे उघडपणे ‘औरंगजेब फॅन क्लब’ चालवत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, शरद पवार यांच्या ‘तुतारी’चा संदर्भ देत त्यांनी “तुतारीतून जातीपातीचे विष पेरले जात आहे,” असा खळबळजनक आरोपही केला.
“मुंबईतही हाच निकाल लागेल!”
नगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय हा केवळ सुरुवात असल्याचे सांगत आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे संकेत दिले. “नगरपालिकांमध्ये जे घडले, तसेच मुंबईतही घडेल. मराठी माणूस तुम्हाला सन्मानाने पाडेल आणि तुमची बेरीज ‘शून्य’ ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कवितेच्या माध्यमातून शेलार यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला असून विरोधकांची मोठी कोंडी केली आहे. शेलार यांच्या या ट्विटमुळे निवडणूकपूर्व वातावरण तापले असून, मराठी अस्मिता आणि स्थानिक राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत असल्याचे चित्र आहे.