अयोध्येत श्रीरामनवमी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. लाखो भक्त या सोहळ्यासाठी येतील असा अंदाज असून त्यासाठीच्या सर्व व्यवस्था अयोध्येत केल्या जात आहेत. हा सोहळा अयोध्येत मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा होणार आहे.
अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतरची येणारी रामनवमी ही पहिलीच रामनवमी आहे. अयोध्येसह देशात सर्वत्र १७ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या रामनवमीचा उत्साह आहे. यंदाच्या रामनवमी सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले असून अयोध्येतही श्रीराम नवमीनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे. रामनवमीच्या दिवशी राम मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात रांगोळ्यांचा सडा, रंगबिरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात येणार आहे. भाविकांचे अयोध्येत आगमन सुरू झाले आहे. हा उत्सव भव्य पद्धतीने साजरा केला जाईल आणि त्यासाठी मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे.
या दिवशी लाखो भाविक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. रामनवीच्या निमित्ताने अयोध्येत ५० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची खास सुविधाही केली जाणा आहे. भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथके तैनात असतील. शरयू नदीत सहा फायबर बोटही असतील. दरम्यान, जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी असेल. मर्यादा, संस्कृती, परंपरा, सात्विकता, संयम आणि शौर्याचा अवतार असलेल्या प्रभू रामांच्या जन्माचा सोहळा अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवालाही वर्षप्रतिपदेपासून प्रारंभ झाला असून हा कार्यक्रम हनुमान जयंतीपर्यंत चालतो. शहरांमधील विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच गावागावांमध्ये श्रीरामोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. श्रीरामोत्सव हा ग्रामोत्सव व्हावा, असे प्रयत्न विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते करतात. धार्मिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रम हे या श्रीरामोत्सवाचे वैशिष्ट्य असते.