पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार दिले असून प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारांबाबत पुण्यात औत्सुक्य आहे.
उमेदवारी देताना वेगवेगळ्या समाजघटकांना भाजपने संधी दिली आहे आणि या नव्या उमेदवारांनाही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
सई आपल्या हक्काची…
भाजपने प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावती मधून सर्वसाधारण महिला गट या जागेवर बावीस वर्षांच्या सई प्रशांत थोपटे हिला उमेदवारी दिली आहे. सिम्बायोसिस विद्यापीठातून एमबीए करत असलेल्या सईचा प्रचारासाठी घरोघरी संपर्क सुरू आहे. गेली काही वर्षे ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रिय होती. विद्यार्थी परिषदेच्या अनेक आंदोलनामध्ये तसेच युवकांसाठीच्या उपक्रमांमध्ये आणि सामाजिक कार्यात ती धडाडीने सहभागी होते. सध्या ती विद्यार्थी परिषदेची पुणे महानगर सहमंत्री अशी जबाबदारी सांभाळत आहे. सामाजिक कार्याचा वारसा वडील प्रशांत थोपटे यांच्याकडून सईला मिळाला. प्रशांत थोपटे हे देखील भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध पदांवर पक्षाचे काम करत आहेत आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही ते सक्रिय असतात.
स्वच्छ रस्ते, पाणीपुरवठा, महिला आणि युवक, विद्यार्थी विकास, आरोग्य, सांस्कृतिक उपक्रम यासाठी मी नेहमी तत्पर राहीन. माझा प्रभाग विकासाचे नवे मॉडेल बनवण्याचा माझा निर्धार आहे, असे साई सांगते.
अमर आवळेच्या रूपाने निष्ठावान कार्यकर्त्याला संधी
भाजपने नवी पेठ, पर्वती या प्रभाग क्रमांक २७ मधून अत्यंत सामान्य कुटुंबातून सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या अमर आवळे याला उमेदवारी दिली आहे. साने गुरुजीनगर या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये चाळ क्रमांक ५ मध्ये राहणारा अमर याने कमवा आणि शिका या योजनेतून त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयटीआयचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याचे आई-वडील हे दोघेही पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. अमरने भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचे काम सुरू केले. गेली पंधरा वर्षे तो राजकीय जीवनात सक्रिय आहे.
परिसरातील नागरी प्रश्न, महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न आणि आंदोलनेही केली आहेत. साने गुरुजी तरुण मंडळाचा उपाध्यक्ष म्हणूनही तो सक्रिय आहे. या मंडळाच्या माध्यमातून युवकांसाठी, महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांबरोबर असणारा आणि सर्वांसाठी काम करणारा तळमळीचा कार्यकर्ता अशी अमरची ओळख आहे.
देवेंद्र वडके सामाजिक कार्यातून राजकीय आघाडीवर
प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपने देवेंद्र प्रभाकर वडके यांना उमेदवारी दिली असून गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्यात आहेत. समाजकार्याचे धडे त्यांना वडील प्रभाकर दत्तात्रय वडके यांच्याकडून मिळाले. ते बाबूकाका म्हणून सर्वपरिचित आहेत. कसबा पेठेत असलेले आदर्श मंडळ म्हणून त्वष्टा कांसार मंडळाचा नावलौकिक आहे. या मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र वडके सक्रिय असून त्वष्टा कांसार समाज संस्थेचे विश्वस्त म्हणूनही ते काम करत आहेत. विविध मंडळांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यामध्ये देवेंद्र वडके अग्रभागी असतात.
सामाजिक कार्य करत असताना अनेक प्रशासकीय बाबी देखील पूर्ण कराव्या लागतात. त्या करण्यासाठी विशिष्ट पदाची गरज असते. त्यासाठी मतदारांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याची मला संधी द्यावी. मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत मी अधिक जोमाने काम करीन, असे आवाहन देवेंद्र वडके प्रचारात करत आहेत.