मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांची सदिच्छा भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा झाली.
“अमितभाईंच्या भेटीतून नेहमीच पुढील वाटचालीसाठी दिशा आणि प्रेरणा मिळते, याचा पुन्हा एकदा अनुभव आला,” असे रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे भाजपच्या राजकीय रणनीतीचे मुख्य शिल्पकार मानले जातात. त्यामुळे, महाराष्ट्रात मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांसह स्थानिक संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या रणनितीला अंतिम रूप मिळाले असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.