नवी दिल्ली: जंतरमंतर येथे नियोजित आंदोलनासाठी जात असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत थेट विमानातच ताब्यात घेतले आहे. अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टर्मिनल ३) विमान उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. विमानतळावर घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे इतर प्रवासीही आश्चर्यचकित झाले.
मुंबईहून दिल्लीला पोहोचलेल्या विमानात १२ महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आणि या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण लागले. विमानाचे दरवाजे उघडताच पोलीस पथक आत आल्याचे पाहताच, अभिजित दीपके यांनी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपण (Live) सुरू केले.
पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत दीपके म्हणाले, “देश कुठे चालला आहे? हे लोक आम्हाला विमानातच अटक करण्यासाठी आले आहेत. इंदिरा गांधी यांनीही असे केले नव्हते. ही हुकूमशाही आहे.” तर, “अधिकारी बळाचा वापर करून घटनात्मक आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी पुस्ती सौरभ दास यांनी जोडली.
या तणावाच्या वातावरणात दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दीपके यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “नाही, ही अटक नाही. कृपया सहकार्य करा,” असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, दीपके यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत म्हटले, “आम्ही बाहेर येईपर्यंत तुम्ही थांबू शकला असता. या, अटक करा आम्हाला. आम्ही घाबरत नाही.”
यानंतर दीपके, दास आणि रांका यांना विमानतळाच्या धावपट्टीवरील परिसरातून बाहेर नेऊन नजरकैद केंद्रात हलवण्यात आले.
या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीने एक अधिकृत निवेदन जारी करत पोलिसांच्या कृतीला “हुकूमशाही नजरकैद” असे संबोधले आहे. “दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या अडवणुकीचा उद्देश आजच्या शांततापूर्ण निदर्शनांचे नेतृत्व आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे,” असा घणाघात पक्षातर्फे करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीतील या अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या अभिजित दीपके यांच्या आई-वडिलांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी दीपके यांच्या निवासस्थानी केवळ एक सुरक्षा रक्षक तैनात होता, मात्र आता दिल्लीतील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन २० पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने दिली आहे.