भेंडी बझार – मुसाफीरखाना मशिदीवर बृह्नमुंबई महानगरपालिकेची कारवाई
दक्षिण मुंबईतील गर्दीने गजबजलेल्या, मुस्लिम बहुल भाग आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भेंडी बाजार भागातील ‘हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना’ ही इमारत आज अखेर काळाच्या पडद्याआड गेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘सी’ वॉर्डाने पोलीस बंदोबस्तात या अत्यंत जीर्ण झालेल्या ऐतिहासिक इमारतीवर महानगरपालिकेमे कारवाई केली. दक्षिण मुंबईचे डीसीपी मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
एकेकाळी हज यात्रेकरूंचे आश्रयस्थान असलेला हा मुसाफिरखाना, पुढे दहशतवादी दाऊद इब्राहिमचे अड्डा बनला होता. आज या इमारतीचे जमीनदोस्त होणे म्हणजे भेंडी बाजाराच्या इतिहासातील एका वादातीत आणि बहुचर्चित भागाचा अंत मानला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेने ही इमारत अत्यंत धोकादायक आणि वास्तव्यास अयोग्य असल्याचे सांगितले होते. कोणत्याही क्षणी इमारत कोसळून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच, इमारतीतील बहुतांश रहिवाशांनी ती आधीच रिकामी केली असली, तरी तळमजल्यावर मशिद सुरू होती. ही इमारत ‘सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट’ (SBUT) अंतर्गत सुरू असलेल्या ‘भेंडी बाजार क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या’ सेक्टर ८ मध्ये येते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या भागातील रस्ते रुंदीकरण आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही इमारत हटवणे आवश्यक होते.
मशिदीच्या स्थलांतरावरून विरोध आणि वक्फ दाव्यांसंदर्भात कायदेशीर वाद निर्माण झाले होते. मात्र, पालिकेने भाडे सवलत किंवा ‘सेक्टर ४’ मधील ‘अल नसर टॉवर’ येथे तात्पुरत्या पर्यायी जागेची तरतूद करत प्रशासकीय पावले उचलली.
हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना: हाज यात्रेकरूंपासून गँगस्टरच्या सावलीपर्यंत
या इमारतीचा इतिहास मुंबईच्या बदलत्या स्वरूपाची साक्ष देणारा आहे.या इमारतीची उभारणी मूळतः मुंबईमार्गे हाज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एक ‘मुसाफिरखाना’ (विश्रामगृह) म्हणून झाली होती. काळ बदलला आणि यात्रेकरूंची ये-जा कमी झाली, तसा या वास्तूचा वापर बदलला. वरील मजले रहिवाशांना भाड्याने देण्यात आले, तर तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने आणि गोदामे सुरू झाली.
मात्र,८० च्या दशकात या इमारतीची ओळख भलत्याच कारणाने जगभर पोहोचली. भारतामधून पळ काढण्यापूर्वी कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबाचे हे सुरुवातीचे निवासस्थान व मुख्य ठिकाण होते. मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासात आणि १९९३ च्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासात या इमारतीचा उल्लेख वारंवार झाला. यामुळे ही वास्तू केवळ एक इमारत न राहता मुंबईच्या गँगस्टर युगाचे एक साक्षीदार केंद्र बनली.
नव्या भेंडी बाजाराचे स्वप्न
भेंडी बाजाराच्या ज्या अरुंद गल्ल्या कधी दाऊदच्या दहशतीने आणि जीर्ण इमारतींच्या सावलीत वावरत होत्या, तिथे आता आधुनिक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ आकार घेत आहे.
हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखान्यावर पडलेला पालिकेचा हातोडा केवळ एका धोकादायक सिमेंट-विटांच्या सांगाड्यावर पडलेला नाही; तर तो मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासातील एका वादग्रस्त पर्वाचा अस्त करणारा आणि दक्षिण मुंबईला अधिक सुरक्षित व आधुनिक बनवणारा आहे.