मुंबई : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने २८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला. मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा धनादेश आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टिपरी यांना प्रदान करण्यात आला.