पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.
टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘विठू माऊली’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीरसाने भारून गेले होते. सोहळ्याच्या सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांवर त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.