Wednesday, March 11, 2026

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…

Share

मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे.

प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात सनातन धर्म जाहीर प्रवेश केला. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे रविवार, ८ मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. ‘वनबंधू ट्रस्ट’ आणि ‘भारत विकास संगम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महालक्ष्मी मातेला साक्षी ठेवून हरेश्वर वनगा यांनी मंत्रोच्चारात विधिवत पूजा आणि हवन केले. या पवित्र अग्नीच्या साक्षीने सर्व कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. या मंगलप्रसंगी बरूमल धामचे पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी सरस्वती आणि सदानंदजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. स्वामींनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या मूळ संस्कृतीकडे परतणे हाच खऱ्या अर्थाने सन्मान आहे. स्वधर्मात परतलेल्या सर्व बांधवांना तेरी शुभाशीर्वाद दिले.

“घरवापसी” एक ऐतिहासिक पुण्यकार्य

वरची बातमी बारकाईने वाचली तर ३ गोष्टी आपल्या लक्षात येतील.

या घरवापसी कार्यक्रमाचे पौराहित्य हरेश्वर वनगा यांनी केलेले आहे. अर्थात आपल्या एका वनवासी बांधवाने धार्मिक पौराहित्य करणे ही एक  युगप्रवर्तक घटना आहे.

जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान।
प्राची की चंचल किरणों पर आया स्वर्ण विहान।।

या गीताची प्रचिती देणारी सकल हिंदू समाजासाठी नव्या स्वर्णिम युगाची ही पहाट आहे.

या घरवापसी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या यादीवर नुसती नजर टाकली तरी घरवापसीचा कार्यक्रम केवळ निवडक सामाजिक व धार्मिक हिंदू संघटनांचा उपक्रम राहिला नसून सकल हिंदू समाजाने तो आपला म्हणून स्वीकारला असल्याची ग्वाही मिळते. आणि स्वधर्मात परतलेल्या भगिनींना प्रेमाची भेट म्हणून साडीचोळी आणि सर्व कुटुंबांना आवश्यक घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. अर्थात घरवापसी केलेल्या बंधू-भगिनींसोबत सकल हिंदू समाज तनमनधनाने उभा आहे. समाजात ते एकटे पडणार नाहीत असे भरभक्कम आश्वासन देणाऱ्या या भेटवस्तू आहेत.

घरवापसी… छत्रपती शिवरायांचे अपूर्ण कार्य आपल्याला पूर्ण करायचे आहे

बजाजी नाईक निंबाळकर हे फलटणचे जहागीरदार आणि शिवाजी महाराजांचे मेहुणे (महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे भाऊ) विजापूरच्या आदिलशाही दरबारात असताना आदिलशहाने त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते.

बजाजींना पुन्हा स्वधर्मात येण्याची इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या मंदिरात धार्मिक विधी (शुद्धीकरण) करवून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेतले. शिवरायांनी करवून घेतलेली ही पहिली “घरवापसी”.

ही पहिलीच घरवापसी असल्यामुळे बजाजींना समाज मान्यता मिळावी यासाठी शिवरायांनी एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी आपली मुलगी सखुबाई यांचा विवाह बजाजींचे पुत्र महादजी निंबाळकर यांच्याशी लावून दिला. या सोयरीकीमुळे बजाजींच्या कुटुंबाला समाजात पुन्हा सन्मानाचे स्थान मिळाले.

नेतोजी पालकर हे स्वराज्याचे सरनौबत होते. १६६५ च्या विजापूर मोहिमेदरम्यान, मोगलांच्या बरोबरीने लढताना नेतोजी पालकर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. यामुळे शिवाजी महाराजांनी पत्राद्वारे त्यांना “समयास कैसा पावला नाहीस” असे म्हणून झापले आणि सरनौबत पदावरून बडतर्फ केले. त्यामुळे नाराज होऊन नेतोजी पालकर सुरुवातीला आदिलशहा व नंतर औरंगजेबाला जाऊन मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटल्यावर १६६६ मध्ये मिर्झाराजे जयसिंगाच्या सल्ल्याने औरंगजेबाने त्यांना अटक केली आणि जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करून त्यांचे नाव ‘मुहम्मद कुली खान’ ठेवले. पुढची १० वर्षे त्यांनी मोगलांच्या वतीने अफगाणिस्तान, कंदहार आणि काबूलच्या मोहिमांवर काम केले. तिथे त्यांनी औरंगजेबाचा विश्वास संपादन केला. १६७६ मध्ये दिलेरखानाच्या फौजेसोबत दक्षिणेत आल्यावर नेतोजींनी मोगलांची साथ सोडली आणि ते रायगडावर शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. त्या काळात एकदा धर्म बदलला की पुन्हा स्वधर्मात येणे कठीण मानले जाई. मात्र, महाराजांनी नेतोजींना ‘प्रायश्चित्त’ देऊन आणि विधीवत शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.

महाराजांनी नेताजींशी नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्या मुलीचा (कमलाबाई) विवाह नेतोजींच्या मुलाशी लावून दिला. या विवाहमुळे नेतोजी पालकर यांच्या घरवापसीला समाज मान्यता मिळाली. वरील इतिहास बघितला असता “घरवापसी” हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला उपक्रम असून तो पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर गेल्या साडेतीनशे वर्षातील हिंदू समाजातील अनेक धर्मवीरांनी घरवापसीसाठी केलेले अफाट कार्य जाणून घेतले तरी आपल्याला त्यांच्यापासून अलौकिक प्रेरणा मिळू शकते.

धर्मभास्कर विनायक महाराज मसुरकर यांची घरवापसी चळवळ

मसूर (जिल्हा सातारा) येथे ‘श्री समर्थ ब्रह्मचर्याश्रम’ स्थापन करून त्याद्वारे सामाजिक आणि धार्मिक जागृती करणारे धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांनी पोर्तुगीज राजवटीत सक्तीने ख्रिश्चन बनवण्यात आलेल्या हजारो हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणले.

१९२८ च्या सुमारास त्यांनी गोव्यातील सुमारे १०,००० ‘गावड’ समाजातील आपल्या बांधवांना पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली. जेव्हा मसूरकर महाराजांच्या या कार्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक केली, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या मदतीला धावून आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभेच्या नेत्यांना त्यांच्या सुटकेसाठी गोव्याला पाठवले होते. त्यांनी शुद्धीकरणाला (घरवापसीला) केवळ धार्मिक विधी न मानता ते एक ‘राष्ट्रकार्य’ असल्याचे मानले त्यांच्या मते, धर्मांतरित हिंदूंच्या वंशजांना पुन्हा स्वधर्मात आणणे हे हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी आवश्यक होते. मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथे पांडुरंग वाडीत त्यांनी स्थापन केलेला मसुराश्रम आजही घरवापसीचे कार्यक्रम आयोजित करत असतो.

स्वामी श्रद्धानंद… घरवापसीसाठी बलिदान दिलेले धर्मवीर

स्वामी श्रद्धानंदांनी (मूळ नाव मुन्शी राम) २० व्या शतकाच्या सुरुवातीला आर्य समाजाच्या माध्यमातून ‘शुद्धीकरण’ (घरवापसी) चळवळ चालवली. या चळवळीचा मुख्य उद्देश धर्मांतरित झालेल्या, विशेषतः ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानाने आणणे, तसेच अस्पृश्यता नष्ट करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे हा होता. छळ किंवा दबावामुळे धर्म बदललेल्या लोकांना विशेषतः हजारो ‘मलकाना रजपूतांना’ त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात आणले. या चळवळीला जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांकडून तीव्र विरोध झाला. परिणामी २३ डिसेंबर १९२६ रोजी दिल्लीत रशीद नावाच्या धर्मांध जिहाद्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. घरवापसीसाठी स्वामी श्रद्धानंद यांनी दिलेले बलिदान आपल्याला विलक्षण प्रेरणा देऊन जाते.

घरवापसीचा स्वयंप्रकाशित दीपस्तंभ – मारियो मिरांडा

मारियो मिरांडा (Mário João Carlos do Rosário de Brito Miranda) हे मूळ गोव्याचे. ते एक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांची अफलातून शैली होती. समाज जीवनाचे जिवंत चित्रण करण्याच्या त्यांच्या लकबीमुळे ते ख्यातनाम झाले होते. टाइम्स ऑफ इंडिया आणि द इलस्ट्रेटेड विकली या ख्यातनाम वृत्त समूहांमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली.

त्यांची भित्तीचित्रे (murals) आजही मुंबईच्या फोर्ट भागातील हॉटेल्सच्या (विशेषतः परदेशी पर्यटकांची वर्दळ असलेल्या हॉटेल्सच्या) भिंतीवर व गोव्यात सार्वजनिक ठिकाणी बघायला मिळतात. पद्मश्री (१९८८), पद्मभूषण(२००२) आणि पद्मविभूषण (मरणोत्तर २०१२) असे तीनही पद्म पुरस्कार पटकावणारे मारियो मिरांडा यांनी आपली पत्नी हबीबा यांच्याकडे आपले दफन न करता दहन करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण आपण धर्माने ख्रिश्चन असलो तरी आपले पूर्वज गोव्याचे गौड सारस्वत ब्राह्मण अर्थात हिंदू होते. काही कारणामुळे त्यांना आपला धर्म बदलावा लागला होता. मात्र आपला डीएनए हिंदूच आहे. त्यामुळे आपला दहनविधी व्हावा ही त्यांची इच्छा होती.

मारियो मिरांडा यांचे ११ डिसेंबर २०११ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या लोटली येथील वडिलोपार्जित घरी निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर प्रथम लोटली येथील ‘सेव्हियर ऑफ द वर्ल्ड’ चर्चमध्ये अंत्यसंस्काराचा मास (Funeral Mass) पार पडला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मडगाव येथील पाजीफोंड येथील हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आला तिथे त्यांचा धाकटा मुलगा रिषाद याने चितेला मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कार करण्यात आले. मारियो मिरांडा यांच्या अंत्यविधीला गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत स्वतः उपस्थित होते.

पुढे १० वर्षांनी ऐन कोविड काळात हबीबा मिरांडा यांचे २३ एप्रिल २०२१ रोजी गोव्यातील लोटली येथील त्यांच्या घरी निधन झाले. पतीचा दहनविधी झाला असल्यामुळे हबीबा मिरांडा यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचाही दहनविधी करण्यात आला. कोविडच्या निर्बंधामुळे अगदी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हबीब मिरांडा यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.

क्रूर अत्याचारी धर्मांध पोर्तुगीजांनी काही शे वर्षांपूर्वी जबरदस्तीने केलेल्या आपल्या पूर्वजांच्या धर्मांतरानंतर देखील मारियो मिरांडा यांना आपल्या डीएनएत दरवळणाऱ्या “हिंदू” सुगंधाची ओळख पटली. खरंच मारियो मिरांडा हे आपल्यासाठी घरवापसीचा एक प्रेरणास्त्रोत आणि स्वयंप्रकाशित दीपस्तंभ आहेत.

“They tried to bury us; they didn’t know we were seeds”

आमची देवळे पाडून, आमच्या गोमातेची हत्या करून, आमचे लालूच दाखवून, जबरदस्तीने बळजबरीने, तलवारीच्या जोरावर धर्मांतर करणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम आक्रमकांनी मुघलांनी, धर्मांध पोर्तुगीजांनी, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आमचा धर्म आमची संस्कृती आमच्या रुढी परंपरा आमचा सकल हिंदू समाज नष्ट करण्याचा शतकानुशतके आटोकाट प्रयत्न केला. “They tried to bury us… पण त्यांना काय माहित आम्ही अमृताचे पुत्र आहोत. कितीही शतके झाली तरी तुम्ही पाडलेल्या देवळांचे आम्ही आमच्या पुरुषार्थाच्या जोरावर पुनर्निर्माण करतो. तुमच्या धर्मांतरावर आमच्याकडे “घरवापसी”ची संजीवनी गुटी आहे. They didn’t know we were seeds”.

“They tried to bury us… they didn’t know we were seeds” या मेक्सिकन उक्तीप्रमाणे आम्ही अनादी अनंत आहोत. आम्ही कालपुत्र आम्हा येईल मरण कैचे… हे त्यांना ठाऊकच नव्हते.

देवेंद्रजींचा धर्मांतरणाच्या मुळावर घाव…

रोग झाल्यावर औषध घेण्यापेक्षा रोग होऊ न देणे हेच आयुर्वेदात श्रेयस्कर मानले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घरवापसीचे औषधोपचार करावेच लागू नयेत यासाठी धर्मांतर नावाच्या रोगाच्या मुळावर घाव घातला आहे. बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या धर्मांतरविरोधी कायद्याच्या मसुद्याला ५ मार्च २०२६ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. जबरदस्तीने, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास दोषी व्यक्तीला ७ वर्षांचा कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या धर्मगुरूला जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (District Magistrate) ६० दिवस आधी लेखी सूचना देणे बंधनकारक असेल.

या कायद्यांतर्गत होणारे गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र (Non-bailable) असतील. केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेले लग्न किंवा फसवणूक करून केलेले लग्न या कायद्यांतर्गत अवैध ठरवले जाऊ शकते. बेकायदेशीर धर्मांतरास मदत करणाऱ्या संस्थांवर बंदी घालण्याची तरतूद देखील यामध्ये प्रस्तावित आहे. हे विधेयक गुजरात आणि मध्य प्रदेशमधील कायद्यांपेक्षा अधिक कठोर असून सध्या हे विधेयक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश ‘लव्ह जिहाद’ सारख्या प्रकारांना आळा घालणे आणि हिंदू मुलींचे संरक्षण करणे असल्याचे मंत्री नितेशजी राणे यांनी सांगितले आहे.

या प्रस्तावित कायद्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.

अन्य लेख

संबंधित लेख