इतिहास कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी तो जगाला समजल्याशिवाय राहत नाही. आज जगाला वैज्ञानिक दृष्टीचे आणि बुद्धीप्रामाण्याचे धडे देणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनी एकेकाळी सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ लोकांवर अमानुष अत्याचार केले आहेत. प्रस्थापित ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांतांना जेव्हा जेव्हा विज्ञान आणि सुधारणेच्या तर्कनिष्ठ प्रश्नांनी आव्हान दिलं तेव्हा तेव्हा चर्चने आपल्या सत्तेचा वज्रप्रहार करून तो विचार दडपण्याचा प्रयत्न केला. हा लढा केवळ सत्तेचा नव्हता, तर तो ‘श्रद्धा विरुद्ध तर्क’ असा मानवी प्रज्ञेचा महासंग्राम होता.
नॉटिंगहॅमशायरच्या मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेला थॉमस क्रॅनमर हा तरुण केंब्रिजमध्ये शिकत असताना इरास्मससारख्या मानवतावादी विद्वानांच्या विचारांनी भारला गेला होता. जर्मनीतून आलेल्या मार्टिन ल्यूथरच्या सुधारणावादी लाटांनी क्रॅनमर यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. ‘जोन’ नावाच्या महिलेशी लग्न केल्यामुळे त्यांना आपली फेलोशिप गमवावी लागली, पण त्याच्या पांडित्याने तो थेट राजा हेन्री आठवा याच्या दरबारात जाऊन पोचला.
क्रॅनमर यांनी चर्च ऑफ इंग्लंडला रोमच्या पोपांच्या जोखडातून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. क्रॅनमर यांनी बायबलचा लॅटिन भाषेतील पडदा बाजूला करून ते सामान्यांच्या इंग्रजीत भाषांतरित केलं. “देवाची प्रार्थना करण्यासाठी मधस्थाची गरज नाही,” हा विचार मांडणं ही तत्कालीन चर्चविरुद्धची बंडाळीच होती. १५४४ मध्ये त्यांनी इंग्रजीतली पहिली अधिकृत धार्मिक सेवा ‘एक्होर्टेशन अँड लिटनी’ आणली. संतांच्या मूर्तीपेक्षा थेट ईश्वरी प्रार्थनेवर त्यांनी भर दिला. १५४९ चे ‘बुक ऑफ कॉमन प्रेअर’ हे आजही अँग्लिकन उपासनेचा आधारस्तंभ मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी ‘ग्रेट बायबल’चे भाषांतर प्रत्येक चर्चमध्ये उपलब्ध करून दिलं, जेणेकरून लॅटिन न समजणारा सामान्य माणूसही धर्म समजून घेऊ शकेल.
मात्र, ‘ब्लडी मेरी’ नावाने कुप्रसिद्ध असलेली कट्टर कॅथोलिक राणी मेरी सत्तेवर आली आणि क्रॅनमर यांचं जगणं दुस्तर झालं. दोन वर्षांच्या तुरुंगवासात त्यांच्यावर इतका मानसिक छळ झाला की, त्यांनी आपल्या प्रोटेस्टंट विचारांचा त्याग करणारा माफीनामा सात वेळा लिहिला. तरीही चर्चने त्यांना पाखंडी ठरवून जीवंत जाळण्याची शिक्षा दिली. २१ मार्च १५५६ रोजी जेव्हा त्यांना जिवंत जाळण्यासाठी खांबाला बांधण्यात आलं, तेव्हा क्रॅनमर यांनी एक अजरामर धाडस दाखवलं. ते म्हणाले, “ज्या उजव्या हाताने मी तो खोटा माफीनामा लिहिला, तोच हात मी सर्वात आधी आगीत अर्पण करेन.” असं म्हणून त्यांनी आधी आपला उजवा हात ज्वाळांवर धरला. ज्वाळांमधे तो हात जळत असतानाही ते शांत राहिले. धर्मांधतेच्या आगीत जळणारा तो उजवा हात आजही वैचारिक क्रांतीचं प्रतीक मानला जातो.
चर्चने धर्मांतर्गत सुधारकांनासोबतच विश्वाचं गूढ उकलणाऱ्या शास्त्रज्ञांनाही शत्रू मानलं. जिओर्डानो ब्रुनो हा मुळात भिक्षू होता, पण त्याने कोपर्निकसचा सूर्य-केंद्रित सिद्धांत पुढे नेला. तो म्हणाला, “ईश्वर हा सृष्टीच्या बाहेर नसून तो सृष्टीच्या प्रत्येक कणात व्यापलेला आहे.” (हे विचार भारतीय ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच मांडले होते). ब्रुनोने आत्म्याच्या पुनर्जन्माचाही विचार मांडला, जो चर्चला मान्य नव्हता. तब्बल आठ वर्षे छळ सोसूनही ब्रुनोने आपले विचार बदलले नाहीत. अखेर १६ फेब्रुवारी १६०० रोजी रोमच्या ‘कॅम्पो दे फियोरी’ इथे त्याची जीभ कापून त्याला जिवंत जाळण्यात आलं. यानंतर गॅलिलिओ गॅलिली यांचा संघर्ष सुरू झाला. स्वतः तयार केलेल्या दुर्बिणीतून जेव्हा त्यांनी पाहिले की चंद्रावर खड्डे आहेत आणि गुरुग्रहाला स्वतःचे वेगळे चंद्र आहेत, तेव्हा चर्चला हादरा बसला. बायबलनुसार पृथ्वी ही स्थिर आणि विश्वाचा केंद्रबिंदू होती. गॅलिलिओचे शोध या ‘ईश्वरी शब्दाला’ आव्हान देत होते. कार्डिनल बेलारमाइन यांनी ताकीद देऊनही गॅलिलिओने जेव्हा ‘डायलॉग’ हे पुस्तक लिहिलं, तेव्हा पोप अर्बन आठवा याने त्यांना पाखंडाच्या आरोपाखाली ओढले. ब्रुनोसारखे मरण टाळण्यासाठी म्हाताऱ्या गॅलिलिओला चर्चसमोर गुडघे टेकून आपली विधानं मागे घ्यावी लागली. तरीही तो पुटपुटला,”E pur si muove.”[तरीही ती(पृथ्वी) फिरतेच आहे.] त्यांचं शेवटचं आयुष्य नजरकैदेत आणि अंधत्वात गेलं, पण त्यांनी विज्ञानाची मशाल विझू दिली नाही. अंधत्वाच्या काळातही त्यांनी Two new Sciences हा ग्रंथ पूर्ण केला.
विज्ञानाच्या वाटेवर रक्ताचे सडे पडले होते. अलेक्झांड्रियाची थोर महिला गणितज्ज्ञ हायपेशिया हिला कट्टर ख्रिश्चन भिक्षूंनी विवस्त्र करून विटांच्या आणि शिंपल्यांच्या तुकड्यांनी तिचे मांस सोलवटून मारलं. रक्ताभिसरणाबद्दल सांगणारा मायकेल सर्व्हिटस असो किंवा निसर्ग हा नियमांनी चालतो असे सांगणारा लुसिलियो वानिनी असो, सगळ्यांच्या विज्ञाननिष्ठतेला चर्चने मृत्युदंडच दिला. वानिनीची तर जीभ कापून त्याला फासावर लटकवलं आणि नंतर त्याचं शरीर जाळून राख केली. या माणसांच्या रूपाने चर्चने शास्त्रीय परंपरेच्याच गळ्याला नख लावलं.
विज्ञान आणि ख्रिस्ती धर्म यांच्यातला हा संघर्ष आजही संपलेला नाही. बायबलमधला जगाची निर्मिती सहा दिवसात झाल्याचा दावा (Genesis) आणि विज्ञानाचा १३.८ अब्ज वर्षांचा ‘बिग बॅंग’ सिद्धांत यात मोठी दरी आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद तर ख्रिस्ती धर्माच्या मूळ पायावरच, म्हणजे ‘आदम-इव्ह’ आणि ‘मूळ पाप’ (Original Sin) या संकल्पनेवरच आघात करतो. जर मानव माकडापासून उत्क्रांत झाला असेल, तर आदमने केलेले पाप उरत नाही आणि ते पाप नसेल तर येशूच्या बलिदानाची गरज उरत नाही. याच भीतीपोटी आजही डार्विन चर्चचा शत्रू आहे.
१९९२ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी गॅलिलिओच्या खटल्याबद्दल ३५० वर्षांनंतर माफी मागितली. पण हा केवळ एक धोरणात्मक देखावा (PR Exercise) होता. व्हॅटिकनकडे स्वतःची वैज्ञानिक अकादमी असली, तरी तिचा उपयोग विज्ञानाला धर्माच्या गुलामीखाली ठेवण्यासाठी केला जातो. व्हॅटिकनच्या गरजेपुरतं आणि सोयीचं असेल अशाच गोष्टींना विज्ञान म्हणणं, इतक्या उच्च कोटीचा दांभिकपणा जगात केवळ व्हॅटिकनच करू शकेल. जेव्हा उत्क्रांतीवादाला पूर्णपणे नाकारणे कठीण झाले, तेव्हा चर्चने ‘इंटेलिजेंट डिझाइन’ नावाची संकल्पना मांडली. ही संकल्पना विज्ञानाच्या वस्त्रात झाकलेला एक धार्मिक सिद्धांतच आहे. निसर्ग स्वतःहून उत्क्रांत होतो, हे मान्य करण्याऐवजी चर्च असा दावा करते की उत्क्रांती ही देवाने आखलेली एक योजना आहे. हा विज्ञानाचा स्वीकार नसून, विज्ञानाला धर्माच्या गुलामीखाली ठेवण्याचा प्रयत्न आहे.
थॉमस क्रॅनमर यांच्या जळणाऱ्या उजव्या हातापासून ते गॅलिलिओच्या नजरकैदेपर्यंतचा इतिहास हा ख्रिस्ती धर्मांधतेच्या क्रूरतेचा साक्षीदार आहे. जिथे पाश्चात्य जगात ‘इन्क्विझिशन’द्वारे छळ केला जाई, तिथे भारतात ‘शास्त्रार्थ’ करण्याची आणि चार्वाकांसारख्या नास्तिकांनाही ‘ऋषी’ म्हणण्याची उदात्त परंपरा होती. सत्याचा शोध हा केवळ तर्काच्या आणि पुराव्यांच्या आधारावरच घेतला जाऊ शकतो, हे विज्ञानाचं तत्त्व स्वीकारणं आणि तसा व्यवहारही करणं हे मानवी प्रज्ञेचा सर्वोच्च अविष्कार आहे. जो भारताने करून दाखवला. प्रस्थापित मताच्या विपरीत जो मत मांडेल त्याला शास्त्रार्थ करून आपला मुद्दा मांडण्याचा आणि स्वतःला पटलेल्या मार्गाने परमसत्याचा शोध घेण्याचा अधिकार हिंदू जीवन पद्धतीत प्रत्येकाला होता. त्यामुळे आज हिंदू चिंतनात अनेक दर्शन शास्त्र परस्परविरोधी असली तरी ती एकाच मूळ सांस्कृतिक प्रवाहाचे उपप्रवाह आहेत. आज जगात स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पाईक म्हणवणारी ख्रिस्ती धर्मांधता जोपर्यंत विज्ञानाचा केवळ सोयीस्कर वापर करेल, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. सत्याचा विजय हा शेवटी पुराव्यांच्या आणि तर्काच्या बळावरच होतो, हेच या ऐतिहासिक संघर्षाचे सार आहे.