Tuesday, December 23, 2025

“नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;” अमीत साटम यांची हुंकार

Share

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत ‘महाविजय’ संपादन केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अत्यंत सूचक विधान केले आहे. “नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है!” या घोषणेद्वारे त्यांनी आता भाजपचे पूर्ण लक्ष मुंबईच्या सत्तेवर असल्याचे स्पष्ट केले आहे.

“विजयाचा ट्रेंड अखंड सुरूच आहे,” असे नमूद करत अमीत साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षश्रेष्ठींच्या सूचनांनुसार आणि जनतेच्या अमोल विश्वासामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

हा विजय केवळ राजकीय संघर्षातील यश नसून, विकास, स्थैर्य आणि लोककल्याणाच्या मार्गावर महाराष्ट्राने उमटवलेली ठळक मोहर आहे, असेही साटम यांनी म्हटले आहे. या यशामागे अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक विजयी उमेदवार, नगराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत आभार मानले.

“जनतेच्या भावना ओळखून, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सेवा करण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे,” असे सांगत त्यांनी आगामी काळात आणखी प्रभावी आणि लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख