Wednesday, January 7, 2026

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

Share

अकोला : “अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते.

अकोला होणार ‘एअरोस्पेस हब’ आणि ‘कार्गो टर्मिनल’
मुख्यमंत्र्यांनी अकोल्याच्या विकासासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला:

विमानतळ विस्तारीकरण: अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच ‘स्कायनेक्स एअरोस्पेस’ सोबतच्या करारातून शहरात ‘एअर ट्रेनिंग सेंटर’ सुरू होणार आहे.

रेल्वे आणि रोजगार: अकोला रेल्वे स्थानकाचा विकास केला जात असून, याला ‘कार्गो टर्मिनल’ म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे अकोल्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पाणी आणि स्वच्छता: वाढीव पाणीपुरवठा योजना, सौरऊर्जा प्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेसाठी कोट्यवधींचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राज राजेश्वर मंदिरासाठी ५० कोटींचा आराखडा
अकोल्याची अस्मिता असलेल्या श्री राज राजेश्वर मंदिर संस्थानाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच शहरात सांस्कृतिक भवन, जलतरण तलाव आणि सरोवरांचे पुनरुज्जीवन करून अकोल्याचे सौंदर्य वाढवले जाणार आहे.

सिमेंट रस्त्यांचे जाळे आणि नवी मनपा इमारत
“पुढील ५ वर्षांत अकोल्यातील सर्व डीपी रोड सिमेंट काँक्रीटचे केले जातील. तसेच महानगरपालिकेची भव्य नवीन इमारतही आपण उभारणार आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अकोल्याला आधुनिक शहर बनवण्यासाठी महायुतीचे व्हिजन स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेला मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांसह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख