मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड होणार, यावर गडबड सुरू होती. अखेर आज विधिमंडळात भाजपच्या (BJP) पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यानंतर कोअर कमिटीची बैठक पार पडली, आणि त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार हे निश्चित झाले आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी मांडला. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी त्याला अनुमोदन दिले, आणि सर्व आमदारांनी होकार दिला. त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदावर एकमताने समर्थन केले होते.
उद्या (५ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शपथ आझाद मैदानावर होणार आहे. याबाबत तयारी सुरू आहे. तसेच, सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. यानुसार भाजपचे २०, शिवसेना शिंदे गटाचे १२, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ मंत्री असण्याची शक्यता आहे.