मुंबई : “अजितदादा हे शब्दाला जागणारे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील गणिते काहीही असोत, पण क्षमतेचा विचार केला तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. दुर्दैवाने, एक सक्षम मुख्यमंत्री राज्याला मिळू शकला नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी अजितदादांसोबतच्या शेवटच्या भेटीपासून त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीपर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
२७ जानेवारीची ‘ती’ शेवटची भेट
मुख्यमंत्री म्हणाले, “२७ जानेवारी २०२६ रोजी आमची बैठक झाली. ती दादांसोबतची शेवटची भेट असेल याची किंचितही कल्पना नव्हती. दादा कधीही वेळ चुकवणारे नव्हते, मात्र अपघाताच्या दिवशी दुर्दैवाने त्यांची वेळ चुकली. मी माझा एक अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे.”
मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न आणि क्षमता
अजित पवार यांनी ६ वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “दादा नेहमी थट्टेने म्हणायचे की मी उपमुख्यमंत्रीच राहीन की काय? पण त्यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने त्यांचे ते स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते, पण काळाने घाला घातला.”
अजितदादांच्या शिस्तीचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दादा मंत्रालयात अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोहोचायचे. “१२ चा कार्यक्रम असल्यास ते ११:५९ ला जागेवर असायचे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कितीही विषय असले, तरी ते पूर्ण अभ्यास करूनच यायचे. त्यांच्याकडे फाईल प्रलंबित राहिली, असं कधीही घडलं नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दुध पिण्याची आवड आणि कामाप्रती निष्ठा
“दादांना आरोग्याची खूप काळजी होती. आमच्या हेलिकॉप्टर किंवा विमानात कधीही कोल्ड्रिंक नसायचे, तिथे नेहमी ‘कोल्ड मिल्क’ असायचे,” अशी आठवण फडणवीसांनी सांगितली. तसेच, इतके मोठे दुःख बाजूला सारून सुनेत्रा वहिनी (उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार) जनसेवेसाठी कामाला लागल्या, याचेही त्यांनी कौतुक केले.