Wednesday, January 7, 2026

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

Share

जालना : “जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे यांसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘येत्या काळात जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. यासाठी येथे जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे वाटपाच्या कामांना येत्या काळात गती देण्यात येणार असून यासोबतच येथे जितक्या घरांची मागणी असेल, तितकी घरे राज्य सरकार देईल’

तसेच, मागील काळात जालन्यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाईपलाईनचे काम पूर्ण केले असून 8 जलकुंभ कार्यान्वित झाले आहेत. जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा आमचा निर्धार आहे. जालन्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे. जालना येथील ड्राय पोर्ट आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे स्टील आणि पोलाद उद्योगाचे केंद्र म्हणून जालन्याची ओळख अधिक मजबूत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना हा परिसर आता उद्योगांना आकर्षित करत आहे. जालन्यामध्ये ICT शाखा, रिंग रोड व अंतर्गत रस्त्यांसाठी निधी, रेल्वे स्थानकाचा विकास, वैद्यकीय महाविद्यालय, जालना-खामगाव रेल्वेमार्ग अशी अनेक महत्त्वाची कामे आपण मार्गी लावली आहेत. लाडक्या बहिणींसाठी जालन्यात ‘उमेद मॉल’लाही मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख