नांदेड: “नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल, याची ग्वाही इथल्या जनसागराने दिली आहे. आम्ही नांदेडच्या विकासाचा ‘संकल्पनामा’ तयार केला असून, १५ तारखेला तुम्ही ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढची ५ वर्षे नांदेडच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथे आयोजित ‘विजय संकल्प रॅली’त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांसह भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर आणि मालकी हक्क
नांदेडमधील गरिबांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावताना फडणवीस म्हणाले की, “अतिक्रमणधारक म्हणून हिणवले जाणाऱ्यांना आता जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे दिले जातील. तसेच इनाम, देवस्थान, मदत मास आणि खिदमत मास जमिनींवर वसलेल्या नागरिकांना ‘पीआर कार्ड’ आणि पक्के घर ‘प्रधानमंत्री आवास योजने’तून मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे.”
पाणी, रस्ते आणि आधुनिक पायाभूत सुविधा
नांदेडच्या मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले:
पाणी आणि रस्ते: पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन आणि दर्जेदार रस्त्यांसाठी भरीव तरतूद.
नंदीग्राम मार्केट: पार्किंग सुविधेसह सिडको भागात बगीचा, जलतरण तलाव आणि थीम पार्कची निर्मिती.
ऊर्जा आणि पर्यावरण: सौर ऊर्जा प्रकल्प आणि नाल्यांच्या कामांसह गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र मिशन’ सुरू करण्यात आले आहे.
नांदेड होणार ‘स्मार्ट आणि सेफ’ सिटी
नांदेडला महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर बनवण्यासाठी दळणवळणाची मोठी कामे हाती घेतली आहेत:
समृद्धी महामार्ग: नांदेडला थेट ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’शी जोडले जाणार आहे.
रेल्वे विस्तार: नांदेड-लातूर आणि नांदेड-बिदर या दोन्ही रेल्वे लाईनला मान्यता देण्यात आली असून राज्य सरकार यासाठी निधी देणार आहे.
आरोग्य सुविधा: नांदेडमध्ये आधुनिक उपचार पद्धतींनी सज्ज असे ‘कर्करोग रुग्णालय’ सुरू करण्यात येत आहे.