Wednesday, January 14, 2026

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”

Share

‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,”   अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.


पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह सर्व उमेदवार या सभेत उपस्थित होते.

‘‘लाडक्या बहिणी भाजपला विजयी करतील. त्यानंतर या लाडक्या बहि‍णींना लखपती दीदी करायचे आहे. महाराष्ट्रात ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. पुढील ४-५ महिन्यांत ही संख्या १ कोटीवर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. या मतदारसंघात पुढील वेळी येताना किती महिलांना लखपती दीदी केले, याचा हिशेब मी नगरसेवकांकडे मागेन. ज्यांना पदे हवी आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लखपती दीदी घडवाव्यात,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

पुणे महापालिकेची निवडणुकीत काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत. मात्र, आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. पुणे हे जागतिक दर्जाचे शहर असल्याचे सांगून त्यांनी विकासाचा लेखाजोखा मांडला. पुण्यात ११० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामध्ये शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून याच वर्षी या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. शिवाजीनगर येथे मेट्रो आणि पीएमपीसाठी इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल हब तयार करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख