
शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर “पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, “येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार असून, विनामूल्य शाडू माती आणि विनामूल्य नैसर्गिक, पर्यावरणपूरक रंग उपलब्धतेनुसार पुरवण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी मूर्तीकारांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.”
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींपासून करणे केव्हाही श्रेयस्करच आणि त्या दृष्टीने आत्तापासून ठोस पावले टाकणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करावेच लागेल. अर्थात आता संबंध महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा मुंबई महापालिकेच्या या निर्णयाचे अनुकरण करतील यात शंका नाही.

पीओपीच्या (PoP/Plaster of Paris) गणेश मूर्तींमुळे पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम निश्चितच चिंताजनक आहेत. POP हे जिप्सम (Gypsum) नावाच्या नैसर्गिक खनिजापासून बनवले जाते. याचे शास्त्रीय नाव कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट (Calcium Sulphate Hemihydrate) असे आहे. PoP मध्ये पाणी मिसळल्यास त्याचे पुन्हा जिप्सममध्ये रूपांतर होते आणि ते काही वेळातच दगडाइतके कडक बनते.
सहाजिकच PoP हे नैसर्गिकरीत्या विघटनशील (Biodegradable) नसल्यामुळे ते पाण्यात सहज विरघळत नाही. त्यामुळे या मूर्ती अनेक महिने किंवा वर्षे तशाच राहतात आणि तलावांचा तळ गाळाने भरून जातो. PoP मूर्तींना रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये पारा (Mercury), शिसे (Lead), कॅडमियम आणि कार्बन यांसारखी घातक रसायने असतात. ही रसायने पाण्यात मिसळल्यामुळे पाणी विषारी होते. रसायनांमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे मासे आणि इतर जलचरांच्या जीवनावर घातक परिणाम होतो. अनेकदा जलचर हे कण खातात आणि त्यांच्या अन्नसाखळीत शिरतात. मूर्तींमधील रसायने आणि जिप्सममुळे पाण्याचे नैसर्गिक स्वरूप बदलून त्याची आम्लता (Acidity) वाढते. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत खराब होतात. न विरघळणाऱ्या मूर्ती मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवला जातो. त्यामुळे पाणी साचून राहते आणि डासांची उत्पत्ती वाढते. विसर्जनानंतर जेव्हा हे पाणी जमिनीत मुरते किंवा गाळ शेतात जातो तेव्हा शेतजमिनीची मातीची सुपीकता आणि गुणवत्ता बिघडते.
त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी वापरलेले थर्माकोल, प्लास्टिकची फुले यासरख्या पाण्यात कधीच न विरघळणाऱ्या वस्तू विसर्जित केल्या जातात. तेव्हा त्या नैसर्गिक जलस्त्रोताचा पुरता विनाश होतो. मुळात मुंबई सारख्या महानगरात गोड्या पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत राहिले तरी किती आहेत आणि जे काही थोडेफार उरले आहेत त्यांचा असा विनाश करणे आपल्याला निश्चितच परवडणारे नाही. त्यामुळेच मुंबई महापालिकेला विशेषतः नव्याने निवडून आलेल्या भाजपप्रणित महायुतीच्या महापौर रितूताई तावडे यांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल धन्यवाद द्यावे लागतील.
भव्य मूर्त्यांची चढाओढ…

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये भव्य मूर्तींची चढाओढ लागलेली असते. १९३४ मध्ये स्थापन झालेली लालबागच्या राजाची पहिली मूर्ती अवघी २ फूट उंच होती. आज त्या मूर्तीची उंची साधारणपणे १२ ते १४ फूट असते. सुदैवाने लालबाग परळ व दक्षिण मुंबईतील बहुतेक सर्व सार्वजनिक गणपती हे समुद्रात विसर्जित केले जातात. त्यामुळे गोड्या पाण्याच्या जलस्त्रोतांना या भव्य मुर्त्यांमुळे फारसा धोका उद्भवत नाही.
शाडूच्या मूर्ती हाच सर्वोत्तम उपाय…

शाडूची माती ही एक नैसर्गिक, पांढरट-करड्या रंगाची अत्यंत बारीक कणांची चिकणमाती आहे. ती प्रामुख्याने नदीपात्रात किंवा डोंगराळ भागात आढळते. गुजरातच्या पोरबंदर भागात ही शाडूची माती मुबलक प्रमाणात आढळते. ही माती पाण्यात सहज विरघळणारी, पर्यावरणपूरक आणि मूर्तीकामासाठी अत्यंत लवचिक असते. शाडूची मूर्ती घरीच पाण्याच्या बादलीत किंवा कुंडीत विसर्जित करता येते. विसर्जनानंतर उरलेली ही माती तुम्ही बागेत किंवा कुंड्यांमधील झाडांसाठी खत म्हणून वापरू शकता. त्यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती बनवणे हाच पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा सर्वोत्तम मार्ग आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवताना तिची उंची साधारणपणे जास्तीत जास्त ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवणे सोयीचे आणि सुरक्षित मानले जाते. काही प्रगत तंत्रांचा वापर करून ५-६ फुटांपर्यंतच्या मूर्ती देखील बनवल्या जातात पण त्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते.
शाडूची माती वजनाने खूप जड असते आणि वाळल्यानंतर तिला भेगा जाण्याची शक्यता असते. मूर्ती जितकी मोठी, तितका तिचा भार वाढतो, ज्यामुळे पायावर दाब येऊन मूर्तीला तडे जाऊ शकतात. मोठ्या मूर्ती आतून पूर्णपणे वाळण्यासाठी खूप वेळ लागतो. जर मूर्ती आतून ओली राहिली, तर ती कमकुवत होऊन कोसळू शकते. शाडूची मूर्ती पीओपीच्या (Plaster of Paris) तुलनेत अधिक नाजूक असते. त्यामुळे मोठ्या आणि जड मूर्तींची वाहतूक करताना त्या फुटण्याची भीती जास्त असते. सार्वजनिक उत्सवांसाठी सहसा १०-१२ फुटांच्या मूर्ती लागतात, परंतु शाडूच्या मातीमध्ये इतक्या उंचीच्या मूर्ती घडवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असते. बहुतेक घरगुती गणपतींसाठी १ फूट ते २ फूट उंचीच्या शाडूच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती दिली जाते. कारण त्या हाताळायला सोप्या आणि विसर्जनासाठी पर्यावरणपूरक असतात.
पेण ते स्पेन : शाडूच्या गणेश मुर्तींचे माहेरघर…

रायगड जिल्ह्यातील पेण हे शहर गणेश मूर्तींचे माहेरघर मानले जाते. गेल्या १२५ वर्षांहून अधिक काळ हा व्यवसाय येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. पेणमध्ये दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख गणेश मूर्तींची निर्मिती केली जाते. या व्यवसायातून दरवर्षी साधारणतः ३०० ते ६०० कोटी रुपयांची उलाढाल होते. येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांसह अमेरिका (USA), ब्रिटन (UK), ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससारख्या देशांत निर्यात केल्या जातात. पेणच्या मूर्ती त्यांच्या सुबकतेसाठी आणि विशेषतः गणपतीच्या आकर्षक डोळ्यांच्या रेखीवतेसाठी ओळखल्या जातात. पेणच्या गणेश मूर्तींना आता भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे. त्यामुळे पेणच्या कलेची ओळख आणि ब्रँडिंग अधिक मजबूत झाली आहे. मात्र पारंपरिक शाडूच्या मातीसोबतच अलीकडच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तीही मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात.
स्वस्त आणि मस्तमुळे PoP कडे ओढा…

शाडू मातीच्या मूर्ती या त्या आकाराच्या व उंचीच्या PoP ज्या मुर्त्यांपेक्षा १.५ ते २ पट महाग असतात कारण, PoP च्या मूर्ती साच्याच्या साहाय्याने जलद गतीने तयार करता येतात. तर शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक कौशल्य, मेहनत आणि वेळ लागतो. नैसर्गिक शाडू माती आणि पर्यावरणपूरक रंगांची किंमत PoP आणि रासायनिक रंगांपेक्षा जास्त असते. शाडूच्या मूर्ती वजनाला जड आणि ठिसूळ असतात. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीचा खर्च अधिक असतो आणि त्या तुटण्याची शक्यताही जास्त असते.
उत्तम दर्जाच्या शाडू मातीची कमतरता आणि ती विशिष्ट ठिकाणांहून (उदा. गुजरात किंवा राजस्थान) मागवावी लागत असल्याने देखील खर्च वाढतो. स्वस्त सुंदर आणि टिकाऊ हा भारतीय जनमानसाचा खरेदीचा मूलमंत्र असल्यामुळे शाडू मातीच्या महागड्या मुर्तींपेक्षा PoP च्या स्वस्त सुंदर आणि टिकाऊ मूर्ती खरेदी करण्याकडे समाजाचा कल अधिक असतो.
भाव तेथे देव…

आपल्या पूर्वजांनी गणेश मूर्ती घडवण्यासाठी पूर्वापार शाडूच्या मातीचाच वापर केला आहे. PoP चा वापर साधारण १९६० ज्या दशकानंतर सुरू झाला. त्याचे बहुतांशी कारण मुर्त्यांच्या भव्य उंचीचा हव्यास आणि किफायतशीर हाच होता. भाव तेथे देव या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी शाडूच्या मातीच्या ४ फुटांपर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती वापरण्याचा आणि PoP च्या मूर्ती गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम जलतलावात विसर्जित करण्याचा दृढ निश्चय केला तर दरवर्षी PoP मूर्तींच्या गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित करण्याचा वाद संपुष्टात येईल व पर्यावरणाचे संरक्षण तसेच संवर्धन देखील होईल.
आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आपण एवढे निश्चितच करू शकतो.