Friday, February 20, 2026

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक!

Share

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदानी, फेडेक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्स एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (आंतरराष्ट्रीय) रिचर्ड स्मिथ व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यग्र प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थापन खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून फेडेक्ससारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र हा देशाच्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून फेडेक्सच्या सुविधेमुळे उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

असे आहे एअर कार्गो हब

फेडेक्सतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी फेडेक्सकडून सुमारे २ हजार ५०० कोटीं रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येणार असून, हा हब भारतासाठी प्रादेशिक पुरवठा व्यवस्थान खर्चाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या सुविधेमुळे भारताचे दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका या प्रमुख जागतिक बाजारपेठांशी थेट व्यापार संपर्क अधिक मजबूत होणार आहे. हा कार्गो हब पुरवठा व्यवस्थान खर्च, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये ६ हजार हून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल. अत्याधुनिक स्वयंचलित सॉर्टिंग सिस्टीम, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग तंत्रज्ञान आणि समर्पित विमान पार्किंग सुविधांमुळे इनबाउंड व आऊटबाउंड शिपमेंटची एकाचवेळी प्रक्रिया शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी उत्पादने, औषधनिर्मिती आणि नाशवंत वस्तूंसारख्या उच्च-मूल्य व वेळेवर आधारित क्षेत्रांना अधिक विश्वासार्ह आणि जलद सेवा मिळणार आहे. या सुविधेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात-आयात क्षमतेत वाढ होऊन पुरवठा व्यवस्थान खर्च कमी होण्यास मदत होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कार्गो क्षमता प्रारंभी सुमारे ०.५ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक राहणार असून, पुढील टप्प्यांत ती सुमारे ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख