गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना आचार्य पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, ‘आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देतांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगारक्षम उपक्रमांमुळे गोंडवाना विद्यापीठ आदिवासी जनतेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आदिवासी नागरिकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे. विद्यापीठाकडून आपल्याला खूप अपेक्षा आहे. या भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना आय.आय.टी., आय.आय.एम. सारखे उच्च दर्जाचे तसेच रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करण्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.