Monday, December 30, 2024

हरित महाराष्ट्रासाठी…

Share

हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे सुरू असलेल्या या कार्यक्रमाला चांगले यश मिळाले आहे. वन विभागाने घेतेलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर दृष्टिक्षेप, २१ मार्च या वन दिनाच्या निमित्ताने…

महाराष्ट्रात वन विभागाने गेल्या काही वर्षांत जी लक्षणीय कामगिरी केली आहे. तीन वर्षांत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, ही त्यातील मुख्य कामगिरी होय. लोकसहभाग तसेच स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन हाती घेण्यात आलेली ही योजना आहे. वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रमात लोकांना स्वयंस्फूर्तीने सहभागी करून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नोंदणी एक कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला असून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोकांचा व्हावा, असे प्रयत्न करण्यात आले आहेत.

मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करायची असेल, तर तेवढी जागाही आवश्यक आहे. वन विभागाला वन क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे वनीकरणाचा भरीव कार्यक्रम वनेतर क्षेत्रावरही घ्यावा लागेल, हे लक्षात घेऊन वनेतर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्याची राज्य शासनाची योजना आहे. त्यानुसार राज्य शासनाचे सर्व विभाग, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, तसेच केंद्रीय आस्थापनांच्या जागांवरदेखील वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे.

वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्याचा वन विभागाने घेतलेला निर्णयही निश्चितच कौतुकास्पद आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. चैत्राम पवार यांचे वन संवर्धनातील कार्य लक्षणीय आहे. त्यामुळे या पहिल्या पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड निश्चितच सार्थ म्हटली पाहिजे.

महाराष्ट्रात शेकरू हा राज्य प्राणी, हरियाल (हिरवा होला, हरोळी) हा राज्य पक्षी, आंबा हा राज्य वृक्ष तसेच जारूल हे राज्य फूल अशी मानचिन्हे आहेत. राज्यात फुलपाखरांच्या अनेक जाती आहेत. मात्र राज्य फुलपाखरू निश्चित करण्यात आलेले नव्हते. फुलपाखरांबद्दल जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि फुलपाखरांच्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे फुलपाखरू पश्चिम घाटापासून विदर्भापर्य़ंतच्या भागात सर्वत्र आढळते.

वन विभागाने घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांचा उल्लेख येथे करता येईल. बंगळुरूच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे शासकीय वनजमिनीवर बोटॅनिकल गार्डनची निर्मिती, फ्लेमिंगो अभयारण्य, विस्तारित कर्नाळा अभयारण्य, तोरणमाळ संवर्धन राखीव क्षेत्र, अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांचे हरितीकरण करण्याचा निर्णय, रस्ते, कालवे, लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवडीचा निर्णय, हरित शहर योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय, वृक्षारोपण यशस्वी करण्यासाठी मूळ रोपे अतिशय उत्तम दर्जाची, उच्च आणि गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी हाय-टेक रोपवाटिकांची स्थापना करण्याचा निर्णय, असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

वन अकादमीला मान
वन विभागाअंतर्गत जे विविध अधिकारी कार्यरत असतात त्यांना चंद्रपूर वन अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीत रूपांतर करण्यात आले. तसेच संस्थेला स्वायत्तताही देण्यात आली. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून या अकादमीला तीन तारांकित मानांकन प्राप्त झाले आहे. वन विभागाची ही मोठी कामगिरी आहे. मंडळाने केलेल्या मूल्यांकनातून देशातील पहिल्या दहा संस्थांमध्ये स्थान मिळवण्याचा मान चंद्रपूर वन अकादमीला मिळाला आहे. वन विभागाची ही कामगिरी नोंद घ्यावी अशी आहे.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख