Sunday, May 26, 2024

मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती

Share

आज २२ मार्च. राम मंदिराचे उद्घाटन होऊन आज दोन महिने झाले. त्याआधी विरोधकांनी कितीतरी प्रकारे या मंदिराविषयी समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि तत्वज्ञान इतके मजबूत आहे की मंदिराची एक वीट सुद्धा हलवू शकले नाहीत. या मंदिर निर्माणाच्या निमित्ताने गेले वर्षभर ‘मंदिर अर्थव्यवस्था’ हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे. त्याचे अनेक पदर आहेत. परंतु त्यामागची मूळ संकल्पना मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

दमनकारी शक्तींच्या आधीची भारतीय अर्थव्यवस्था
हिंदू धर्म ही एक अतिशय विशेष अशी जीवनपद्धती आहे. अब्रहामिक पंथामधील धार्मिक आयुष्यपद्धती आणि हिंदू जीवनपद्धती यात जमीन-आसमानाचा फरक आहे. अनेक अभ्यासक आता १००० वर्षांपूर्वीच्या भारताचे शास्त्रीय पद्धतीने चित्रण करू लागले आहेत. मुस्लीम किंवा इतर आक्रांतांच्या भारतात घुसण्याआधी सामान्य भारतीय जीवनव्यापन मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेले होते. आध्यात्मिक, आर्थिक, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुविधा इत्यादी गोष्टी मंदिर व्यवस्थापन पुरवीत असे. सगळा समाज म्हणजेच प्रत्येक व्यक्ती व्यक्तिशः समाजजीवनात काही ना काही अर्थपूर्ण, सकारात्मक भूमिका निभावत असे. सगळा समाज म्हणजे एक कुटुंब होते. हिंदू मान्यतेनुसार केवळ मानवप्राणीच नाही तर पाळीव पशुपक्षी, शेती, जंगले, जंगली श्वापदे, सर्व प्रकारचे भौगोलिक आणि नैसर्गिक घटक जसे नद्या, डोंगर, तळी, समुद्र, सूर्य चंद्र, ग्रहतारे असा या विश्वातील कणनकण प्रत्येकाच्या कुटुंबाचा, मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता. आणि मंदिर म्हणजेच तिथे अध्यभूत असणाऱ्या आध्यात्मिक, दैवी शक्तीला मध्यबिंदू धरून हे जगडव्याळ चालत रहाते अशी हिंदू समाजाची जीवनविषयक तत्त्वज्ञानाची मूळ संकल्पना होती. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, ‘चराचरात परमेश्वर’ या संज्ञा आपण आजही मानतोच ना ! चुकून कोणा व्यक्ती किंवा वस्तूला पदस्पर्श झाला तर नमस्कार करून क्षमायाचना करतोच आपण. शिक्षण, अन्न व आरोग्य या गोष्टी समाजसहभागातून प्रत्येक इच्छुकाला दिल्या जातील अशी सोय त्या काळी भारतात होती. पुरुषच नाही तर स्त्री शिक्षणासाठीही विशेष व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. कारण मागणीच मोठी होती. त्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धती, अन्नछत्रे, औषधालये आदी व्यवस्था मंदिर प्रांगणात केल्या जात असत.

लोक आपापल्या व्यवसायात परमेश्वराला आपला भागीदार समजून नफ्यातील, किंवा उत्पन्नातील काही रक्कम मंदिरात पोचावित असत. त्यामुळेच तर शेकडो, हजारो मंदिरे अत्यंत श्रीमंत, समृद्ध होती. कला, शास्त्र, गणित, नृत्य, स्थापत्य, इत्यादी सांस्कृतिक व शिक्षण विषया साठीच नव्हे तर परदेशी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, किंवा नवनवे संशोधन, प्रयोग करू पाहणाऱ्या मंडळींना या मंदिरांचे व्यवस्थापन आर्थिक मदत करीत असत. अतिशय सचोटीने हे सगळे चालत असे. कारण ‘दैवी अनुष्ठान’ हा सगळ्या व्यवस्थेचा मूळ गाभा होता.

पण कालौघात बऱ्याच संकल्पना त्यांच्या मूळ स्वरूपात न राहता त्यांचे विद्रुपीकरण होत गेले.
मुस्लीम आक्रांतांनी जश्या मूर्ती भंग केल्या तश्याच या संकल्पना, त्यामागचा विचार, धारणा, समाजाच्या मनातला विश्वासही खंडित केला. तरीही आज राम मंदिर निर्माण होत असताना सगळा भारत जय श्रीरामच्या जयघोषाने केशरी ध्वजपताकांनी न्हाऊन निघतो आहे. जे नैसर्गिक असते ते टिकते, फोफावते, आपल्या मूळस्वरुपात झळाळून उठते. हाच अनुभव आपण या निमित्ताने घेत आहोत.

आज पद्मनाभस्वामी मंदिर जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर का, कधी,कसे बनले? मुस्लीम टोळ्यांनी भारतात येऊन ‘इथली मंदिरे लुटली’ म्हणजे नक्की काय झाले? आजच्या काळात आपण मंदिरात जातो, तेव्हा चोरून नेण्यासारखे काही दिसते का? सोनेकी चिडिया म्हणून ओळखला जाणारा, किंवा जिथे सोन्याचा धूर निघत असे तो भारत नक्की कसा होता? अशा प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. असो.

मंदिरे बांधण्याच्या ऐवजी लोकांना नोकऱ्या द्या असाही एक मतप्रवाह ऐकायला मिळतो. या ओरडण्यामागे सरकारी नोकरीचे व आरक्षणाचे गाजर दाखवून समाजाला निष्क्रिय, अस्वस्थ करून ठेवायचा डाव आहे का? याचा विचार करणेही गरजेचे आहे. कारण समाज स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी अंतःप्रेरणेतून जितक्या व्यवसायाच्या किंवा नोकऱ्यांच्या संधी निर्माण करू शकेल तितक्या सरकारी नोकऱ्या देणे सर्वथा अशक्य आहे. आज भारताच्या एकूण जीडीपी पैकी २.५ ते ३ टक्के उत्पन्न मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित व्यवसायांद्वारे भारताला मिळते. याचाच अर्थ इतके लोक विविध प्रकारे मंदिरे, देव, श्रद्धा इत्यादी संकल्पनांशी जोडलेले आहेत. आणि आपली आर्थिक गरज त्यातून भागवत आहेत. मंदिर या व्यवस्थे बाबत ओरड होत राहिली तर या लोकांना कोणते काम मिळणार?

आध्यात्मिक टुरिझम हा एक अत्यंत सफल असा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ घातला आहे. सरकारी आकडेवारीनुसार केवळ एका अयोध्येच्या राम मंदिरातच दर वर्षी कमीत कमी ५ कोटी लोक दर्शनाला येतील. वर्षाला २ कोटी लोक हज यात्रा करतात. यावरून हे आकडे किती महाकाय आहेत याचा अंदाज बांधता येऊ शकेल. आणि भारतात अशी कित्येक आध्यात्मिक श्रद्धास्थाने, शक्तिपीठे आहेत. आजमितीला २००, २५० मोठी भारतीय शहरे त्या शहरातील देवालयांमुळे आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानची वार्षिक आर्थिक उलाढाल ३००० करोड रुपयांची आहे. आपले शिर्डी देवस्थान कमीतकमी ५०० कोटींची उलाढाल करीत असते. गेल्या कुंभमेळ्यासाठी सरकारने ४००० करोडची गुंतवणूक केली. सामान्य अंदाजानुसार त्याद्वारे कुंभ काळात १ लाख करोड रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहिली. ही केवळ उदाहरणे आहेत.

अब्रहमिक पंथांच्या निराशाजनक प्रयोगांमुळे सगळ्या जगाला मानसिक शांती, भक्ती, आध्यात्मिकतेची तहान लागली आहे. त्यामुळे त्यांचे डोळे भारताकडेच लागले आहेत. येत्या ५-१० वर्षांत या सगळ्या व्यवसायांची व्याप्ती सामान्य माणसाच्या कल्पनेच्या कित्येक पट जास्त असणार आहे.

जगभरात आता डॉलर अर्थव्यवस्था डबघाईला येताना दिसते आहे. आणि जगाला शाश्वत उपाय उपलब्ध करून द्यायचा असेल तर अस्सल भारतीय पद्धतीची, सनातन काळापासून चालत आलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यवस्था भारतीय समाज आणि सरकारने पूर्ण ताकदीने जगासमोर मांडायला सुरुवात केली पाहिजे. पंतप्रधान मोदी जेव्हा भाषणात सांगतात, की हा सुवर्णकाळ आहे. येत्या हजार वर्षांची मानवी जीवनाची पायाभरणी होते आहे, तेव्हा त्यांनाही हेच म्हणायचे असेल का?

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय तसेच ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख