Monday, August 25, 2025

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

Share

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारीपाड्याचं वनभूषण चैत्राम पवार यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी. 


सोलापूरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा ‘वनभाजी महोत्सव’ यशस्वी केला. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात चैत्राम पवार यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाड्याचा विकास कसा घडवून आणला, याची कहाणी त्यांच्या साध्या, सोप्या शब्दांत एैकवली. बारीपाड्याचं नंदनवन करणाऱ्या या ध्येयवेड्या कार्यकर्त्याचं मनोगत सर्वांनाच खूप भावलं. चैत्राम पवार यांच्या प्रेरणेतूनच बारीपाड्याचा विकास झालेला असला तरी त्यांच्या मनोगतामध्ये कोठेही ‘मी’ नव्हता.’ आम्ही हे केलं.’  ‘गावानं हे घडवलं,’ असंच ते सांगत होते.
वनभाज्यांची, वनौषधींची माहिती भीमाशंकरच्या खोऱ्यातून आलेल्या बंधू-भगिनींकडून एैकणं, वनौषधींची माहिती देणारं प्रदर्शन पाहणं आणि वनवासी भगिनींनी तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद असे वनभाजी महोत्सवाचे तीन भाग होते. या महोत्सवात आलेला प्रत्येकजण वनभाज्यांची माहिती मोठ्या उत्सुकतेनं घेताना दिसत होता. ही भाजी कोणती, याचा काय उपयोग, या सालीचं काय करायचं, ही भाजी कशी करायची, हे कंद बागेत कसे लावायचे… असे अनेक प्रश्न एकनाथ वाघ यांना आलेली मंडळी विचारत होती. ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरगावचे राहणारे आहेत. प्रत्येकाला ते वनभाज्यांची आणि वनौषधींची माहिती अगदी सविस्तर देत होते. अनेकांनी या भाज्यांची खरेदीही केली.


आंबेगाव तालुक्यातून आलेल्या माधुरी गेंगजे आणि त्यांच्या सहकारी भगिनीही वनभाज्या आणि वनौषधींची माहिती छान सांगत होत्या. मध, नाचणी आणि अन्यही काही उत्पादनं त्यांच्या स्टॉलवर होती. शतावरी, गुळवेल, शिमटीच्या झाडाची साल, हाडसांधी, आमसूल पाने, या बरोबरच कुरडू, चिंचरडा, चैताचा बार, तेरची कपाळ फोडी, भुई आवळा, शंकू, चिंगळी अशा अनेकविध भाज्या या महोत्सवात वनवासी भगिनींनी आणल्या होत्या.


वनभाजी थाळीचा आस्वाद
पुणे जिल्ह्यातून आलेल्या वीस जनजाती बंधू-भगिनींनी स्वयंपाकाची आघाडी सांभाळली होती. अगदी वेळेवर पदार्थ तयार झाले होते आणि नाचणीच्या गरम गरम भाकऱ्या तव्यावरून थेट पानात वाढल्या जात होत्या. भोजनाची ही सेवा सशुल्क होती आणि आलेल्या प्रत्येकानं त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. नाचणीची भाकरी, वनभाज्या, आंबील आणि ठेचा अशा वनभाजी थाळीचं शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आलं होतं. वनभाजी थाळीची ही संकल्पना अनेकांसाठी नवीनच होती.


बारीपाड्यातील परिवर्तन
बारीपाड्यात प्रश्न दिसत होते, पण काम काय करायचं याची दिशा नव्हती. मग सर्वप्रथम जंगल सांभाळण्याचं काम आम्ही हाती घेतलं. पुढच्या टप्प्यात पाणी उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलं. पुढच्या टप्प्यात जमिनीसाठी काम केलं. जल, जंगल, जमीन हे तीन बिंदू विकसित करायचे तर जन म्हणजे माणसांचंही संघटन झालं पाहिजे हे लक्षात घेऊन गावपातळीवर वेगवेगळ्या समित्या तयार करून जन-संघटन केलं. त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे जानवर म्हणजे पशुधन. त्या पशुधनाचा सांभाळ आणि त्यातही अनेक उपक्रम केले. अशा प्रकारे या परिसराच्या विकासाचा एक टप्पा यशस्वी केला आहे, अशा शब्दांत चैत्राम पवार यांनी मुक्त संवाद कार्यक्रमात त्यांच्या कामाची माहिती दिली.


कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर केंद्र सरकारनं वन विज्ञान केंद्र स्थापन करण्याची योजना सुरू केली आहे. त्यातील पहिलं केंद्र बारीपाडा हे असेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांसाठीचं हे केंद्र बारीपाड्यात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


‘जनजाती कल्याण आश्रमा’चे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनय वरणगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे, शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, अरुण उपाध्ये यांची उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. प्रा. वृषसेन धनके यांनी सूत्रसंचालन केलं.

महत्त्वपूर्ण उपक्रम
सोलापूर जिल्ह्यात जनजाती क्षेत्र नाही. मात्र तरीही दुर्गम भागात राहणाऱ्या जनजाती बांधवांना जोडण्याचं काम ‘जनजाती कल्याण आश्रमा’तर्फे केलं जातं. शहरवासी आणि वनवासी यांनी एकत्र येणं आवश्यक आहे आणि हेच या महोत्सवात घडून आलं. त्यामुळेच ‘कल्याण आश्रमा’चा हा उपक्रम ‘वनवासी-शहरवासी, आपण सारे भारतवासी’ हा भाव जागवणारा ठरला.

अन्य लेख

संबंधित लेख