Saturday, March 15, 2025

सहकार क्षेत्रातील विश्वास, सेवा आणि अविरत प्रगती करणारी जनता सहकारी बँक

Share

पुणे : पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक क्षेत्रीय कार्यालय पुण्यात (Pune) सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज पुण्यात केली. जनता सहकारी बँकेच्या (Janata Sahakari Bank Ltd., Pune) अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. या कार्यालय़ासाठी केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुढाकार घेतल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने 1949 सारी स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने 75 वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा 15000 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या यशस्वी कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व हितचिंतकांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता.

संघाच्या स्वयंसेवकांनी तयार केलेली बँक ही एक चांगलीच संस्था आहे. या संस्थेला श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांचा आशिर्वाद लाभला आहे. मोरोपंतजी ज्यांनी प्रसिध्दीसाठी कधीही काम केले नाही. कोणत्याही मोठ्या आव्हानाला कधीही पाठ दाखवली नाही. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आपल्या जीवनांत चार तासच त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परंतू त्या चार तासातच देशासाठी, हिंदूत्वासाठी, विचारधारेसाठी सार्वजनिक जीवनासाठी कशा प्रकारे चांगला विचार केला जाऊ शकतो, याची शिकवण त्यांनी मला दिली. असे त्यांच्याबद्दलची आठवण सांगताना ते म्हणाले.

कोणतीही संस्था ७५ वर्षांपर्यंत जेव्हा सातत्याने प्रगतीपथावर असते तेव्हा त्याचे संस्थापक, संचालक आणि सदस्य तिघेही सर्व उद्देशांची पूर्तता करतात आणि तेव्हाच एखादी संस्था मोठी होऊ शकते. असेही ते बँकेबद्दल बोलताना म्हणाले. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवणे, २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्सची करणे हे दोन संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या विकासाशिवाय हे दोनही संकल्प अर्धवट राहतील. प्रत्येक माणसाचा, कुटुंबाचा विकास आणि याबरोबरच देशाचा विकास हे सहकार क्षेत्रामुळेच शक्य आहे. विकसित राष्ट्र होण्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असल्याचेही अमित शाह यावेळी बोलताना म्हणाले.

बँकेच्या ७५ वर्षाच्या प्रवासाचा कौतुकास्पद वाटचालीचा उल्लेख शाह यांनी केला. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बँकेने राबविलेले विविध सामजोपयोगी उपक्रम बँकेची वेगळी प्रतिमा निर्माण करतात असेही ते म्हणाले. पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक क्षेत्रीय कार्यालय CRCS पुण्यात सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केली. यामुळे सुविधा मिळणार आहे. देशभरातील कार्यालय उभारणीची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले.

देशात १४६५ सहकारी बँका आहेत, परंतू सर्वात जास्त बँका या महाराष्ट्रात ४६० इतक्या आहेत.

बँकिंग क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची पुंजी जमवण्यात आली असून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एका छताखालील संघटना, सहकारी बँकाना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी काम करणार आहे. यामध्ये कोणत्याही बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, तांत्रिक सहाय्य मिळवून देण्यासाठी, कोअर बँकींगची सुविधा उपलब्ध करुन देणे आदी विविध मुद्यांवर ही संघटना काम करेल. सर्व नागरी सहकारी संस्था, ग्रामीण सहकारी बँक, राज्य तसेच जिल्हा सहकारी बँकांसाठी लागणारे मदतीचे काम ही संघटना पाहणार आहे. पुढील दोन वर्षात हे संघटना कार्यरत होईल. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकारी बँकांना तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. असे गौरवोद्गारही अमित शाह यांनी यावेळी बोलताना काढले.

अन्य लेख

संबंधित लेख